होम आयसोलेशन कीट हा भाजपचा प्रसिद्धी स्टंट! वाचा, कोण म्हणालं असं…

भाजप सरकार कोविड काळातही भ्रष्टाचारात बरबटले आहे. होम आयसोलेशन कीट वाटप मोहीमही एक मोठा भ्रष्टाचारच असल्याचा आरोप होतोय.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील भाजपा सरकार आजाराचा बाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा सरचिटणीस अमरनाथ पणजीकरांनी (Amarnath Panajikar ) केलाय. भाजपा सरकार फक्त प्रसिद्धीसाठी हपापल्याचे पणजीकर म्हणाले. होम आयसोलेशन कीट बॉक्सवर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा मास्क नसलेला फोटा छापला आहे. देवाने गोमंतकीयांना उत्तम आरोग्य द्यावे व या कीटपासून लोकांना दूर ठेवावे, अशी आम्ही प्रार्थना करतो अशी बोचरी टीका पणजीकरांनी केलीय.

कोविड महामारीच्या काळातही भाजपने भ्रष्टाचार करुन माया जमविण्याची एकही संधी सोडली नाही. लोकांना आरोग्य सुविधा देण्याचे सोडून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व इतर सर्व मंत्री सरकारी तिजोरी लुटत असल्याचा गंभीर आरोप पणजीकरांनी केला.

संपूर्ण गोव्यात कोविड चाचणी करण्याची मागणी लोक करत होते. त्यावेळी चाचणी ऐवजी मुख्यमंत्र्यांनी हट्टाला पेटून सामाजिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असे पणजीकर म्हणाले. ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना १५ लाख गोमंतकीयांसमोर जाण्यास भाग पाडले. आजपर्यंत सदर सर्वेक्षणातून नक्की काय बाहेर आले हे कुणालाच माहीत नसल्याचं पणजीकर म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. जितेंद्र देशप्रभू (Jitendra Deshprabhu) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात एका डॉक्टरचे केलेले निलंबन मागे घेण्यात आले. सदर डॉक्टर भाजपच्या माजी दिवंगत मुख्यमंत्र्याचा नातेवाईक होता अशी माहिती पणजीकारांनी दिली. कमिशन खाण्यासाठी सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास विलंब केला. खासगी इस्पितळांना भरमसाट बिले आकारुन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची मुभा दिली असा आरोप पणजीकरांनी केलाय.

पुढे बोलताना पणजीकर म्हणाले, लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराचे प्रशस्तीपत्र दिलेला बांधकाम कामगार कल्याण निधी घोटाळा कोविड महामारी काळातच भाजपने केला. सर्व हॉटेल्स व शॅक्स बंद असतानाही पर्यटन मंत्री बाबू आजगांवकरानी आपले मिशन ३० टक्के कमिशन चालूच ठेवले. हप्ते गोळा करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडे तगादा लावला. गोव्यातील जनता उघड्या डोळ्यानी भाजपचा भ्रष्ट कारभार पाहत असून, २०२२ च्या निवडणुकीत लोक भाजपला योग्य धडा शिकवतील, असे पणजीकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!