‘आठवणीतील राहुल’ पुस्तकाचे प्रकाशन

पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुलाच्या सभागृहात कार्यक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘आठवणीतील राहुल’ या सीता चव्हाण लिखित, राजकुमार देसाई संपादित, मनोहर कोरगावकर संकलित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुलाच्या सभागृहात पार पडला. हसत्या खेळत्या वयात अवघ्या विसाव्या वर्षी दुर्देवाने अचानक अपघातात गेलेल्या आपल्या मुलाच्या गोड आठवणी पुस्तक रुपात सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आणि आपला भाऊ राहुल राठोड हा सर्वांच्या आठवणीत राहावा म्हणून पर्वरी येथील सीता चौहान हिने आपल्या भावाच्या जन्मापासून ते अकाली मृत्यूपर्यंतच्या आठवणी ‘आठवणीतील राहुल’ या पुस्तकात संपादित केल्या.

राजकुमार देसाई यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली, तर सुचित्रा नाईक हिने हे पुस्तक तयार होण्यास खूप मोठी मदत केली. राहुल राठोड हा विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी होता.

मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, सदस्य राजकुमार देसाई, दत्ता नाईक, सुरेश कुलकर्णी, रामा चोडणकर, मनोहर कोरगावकर, विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण भावे, सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, सामंत विद्यालयाचे शिक्षक गोपाळ देसाई, लेखिका सीता चव्हाण हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राहुल चव्हाण यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मान्यवरांचा परिचय म्हाळसाकांत देशपांडे यांनी करून दिला. ‘आठवणीतील राहुल’ या पुस्तकाची प्रस्तावना राजकुमार देसाई यांनी केली, तर पुस्तकाबद्दल माहिती भूषण भावे यांनी सांगितली. तद्नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

राहुल सगळ्यांना आवडायचा

यावेळी बोलताना राजकुमार देसाई म्हणाले, या पुस्तकाचे प्रकाशन करताना मला विशेष आनंद होत आहे. राहुलचा जन्म अत्यंत गरीब व मागासलेल्या कुटुंबात झाला. त्याची आई गंगा घरकामाला जायची व वडील अशोक राठोड मच्छीमारी काम करायचे. त्यांना तीन मुली व राहुल हा एकुलता मुलगा. अत्यंत गरीब घराण्यात जन्म होऊनही राहुलने कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. चांगले संस्कार मिळालेला राहुल सगळ्यांना आवडायचा. नेहमी न चुकता संघाच्या शाखेत जायचा.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही राहुल विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना देवाकडे केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामंत विद्यालयाची शिक्षिका समीरा येडवे हिने केली. आभार सरीना बगळी हिने मानले. सर्व कार्यक्रमाची व्यवस्था गोपाळ देसाई यांनी पाहिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!