डॉ. लोहियांच्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन

गोवा क्रांतीच्या अमृत महोत्सव दिनी होणार अनावरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः यंदा 18 जून गोवा क्रांती दिनाला 75 वर्षं पूर्ण होत असून त्यानिमित्य नवी दिल्लीच्या डॉ. राम मनोहर लोहिया रिसर्च फाउंडेशनतर्फे डॉ. लोहियांनी लिहिलेल्या ‘ऍक्शन इन गोवा’ या दुर्मिळ अशा ऐतिहासिक पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करण्यात येणार आहे.

हेही वाचाः कांदोळीत विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू

ऑनलाईन माध्यमातून होणार प्रकारशन

हा प्रकाशन समारंभ ऑनलाइन लाइव्ह स्वरुपात फाउंडेशनच्या फेसबूक पेजवरू (https://www.facebook.com/drmlrf/) प्रदर्शित होणार असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक दस्तावेजाचं प्रकाशन करतील. गोवा क्रांतीच्या अमृतमहोत्सवानिमित्त फाउंडेशनतर्फे यंदा 18 व 19 जून रोजी दोन दिवसांची त्रिराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु कोविडच्या महामारीमुळे आता ती सप्टेंबरमध्ये मडगावच्या रवींद्र भवनमध्ये संपन्न होईल.  त्याऐवजी हा प्रतिकात्मक स्वरुपाचा पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजिण्यात आलेला असून डॉ. लोहिया 1946 मध्ये दुपारी 4 वाजता अभिव्यक्तीबंदी कायदा मोडून मडगाव शहरात भाषण करण्यास उभे राहिले होते, अचूक त्याच समयी हा कार्यक्रम संपन्न होईल.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ

केवळ दोनच ठिकाणी दुर्मिळ पुस्तकाची प्रत उपलब्ध

याविषयी माहिती देताना लोहिया फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक रंजन सिंग यांनी सांगितलं, की केवळ कलकत्त्याच्या वाचनालयात  आणि गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक  नागेश करमली यांच्या संग्रही जानेवारी 1947 मध्ये प्रकाशित झालेल्या या दुर्मिळ पुस्तकाची प्रत उपलब्ध आहे.

हेही वाचाः सरकारी बाबुंनी नाचवले कागदी घोडे…समस्येचे मात्र भिजत घोंगडे !

काय आहे पुस्तकात?

या पुस्तकात 18 जून रोजी त्वरित अटक केल्याने लोहिया जे भाषण करू शकले नव्हते, ते संपूर्ण भाषण उपलब्ध असून शिवाय डिसेंबर 1946 मध्ये त्यांनी लिहिलेले ‘ओपन लेटर टू गोवन्स’ हा ऐतिहासिक ठेवाही त्यात समाविष्ट आहे. तसंच डॉ. लोहियांच्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देऊन महात्मा गांधींनी आपल्या हरिजन या वृत्तपत्रातून लिहिलेले लेख तसंच वृत्ते आणि त्यांचा गोव्याच्या तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरशी झालेल्या जाहीर वादावादीचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे.  याशिवाय 18 जून व नंतर महिनाभर चाललेल्या निषेध सभा आणि मोर्चांचे डॉ. ज्युलियांव मिनेझीस यांनी केलेलं आंखो देखा वृत्तांकन आणि तेव्हाच्या महिला पत्रकार शांती नायक यांनी लोहियांनी गोव्याबाहेरून केलेल्या चळवळीचा लिहिलेला  वृत्तांतही या पुस्तकात उपलब्ध आहे. 

या पुस्तक प्रकाशनाचं सूत्रसंचालन गोव्याच्या नेहरू ट्रस्टचे सरचिटणीस अनंत अग्नी करतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!