तणावपूर्ण वातावरणात न्हावेलीत जनसुनावणी

वेदांताच्या प्रकल्प विस्ताराचे प्रकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली: न्हावेली-साखळी येथे रविवारी कडक पोलीस बंदोबस्तात सेसा गोवा वेदांता कंपनीच्या विस्तार प्रकल्पावर जनसुनावणी घेण्यात आली. अतिशय तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या जनसुनावणीत स्थानिकांनी विस्ताराला विरोध दर्शवला. ही जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने दुपारपर्यंत गोंधळ माजला होता. त्यामुळे सकाळी ९.३० वाजता सुरू होणारी जनसुनावणी दुपारी २.३० वाजता सुरू झाली.

जनसुनावणीत स्थानिकांचा गोंधळ

सेसा गोवा वेदांचा कंपनीचा न्हावेली येथे प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव कंपनीने सादर केला आहे. पण याला स्थानिकांचा विरोध असल्याने रविवारी जनसुनावणी घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे न्हावेली येथील मैदानावर सकाळी ९.३० वा. जनसुनावणी सुरू झाली. यात उत्तर जिल्हाअधिकारी अजित रॉय, अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो, डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, आरंभीच स्थानिकांनी जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.

म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी चार तासांसाठी पुढे ढकलली…

ही जागा आपल्या वडिलांच्या मालकीची आहे. जनसुनावणीसाठी मालकाची परवानगी घेतली नसल्याने ही सुनावणी बेकायदेशीर आहे, असे पवित्रा माजी आमदार प्रताप गावस यांनी घेतला. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी चार तासांसाठी पुढे ढकलली. शेवटी स्थानिकांनी निवेदन सादर केल्यानंतर दुपारी २.३० वा. जनसुनावणी सुरू झाली. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी प्रकल्प विस्तारावर आक्षेप घेतला. अनेकांनी आपले आक्षेप लेखी स्वरूपात दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!