दिनकर मावळला! गोव्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ गायक पंडित दिनकर पणशीकरांचं निधन

वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्याचे सुपुत्र, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीततज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालंय. आज (2 नोव्हेंबर ) दुपारी मुंबई नजीक अंबरनाथ इथल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते.

कट्यार काळात घुसलीमध्ये काम

नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू असलेल्या दिनकर पणशीकरांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या कडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातही भूमिका केली होती.

संगीत विभागाचे प्रमुख

‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या 200 बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा कला अकादमीचे ते ‘संगीत विभाग प्रमुख’ होते. शेकडो शिष्य त्यांनी घडवले.

गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2017 साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती (fellowship) प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केलाय.

गोयकार सुपुत्रावर झालेला अन्याय दूर व्हावा म्हणून पं. दिनकर पणशीकर यांनी खूप प्रयत्न केले पण दुर्लभ विद्या आत्मसात करणाऱ्या श्री.भारत बाणावलीकरांना गोवा सरकारने न्याय दिला नाही ही खंत नेहमी पंडितजी बोलून दाखवत.

पाहा त्यांनी गायलेलं खास गाणं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!