राज्यातील सर्व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देणार; शेतकऱ्यांनाही मिळणार भरपाई

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं आश्वासन; डिचोलीत आर्थिक मदतीचे वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान  झालेल्या सर्वांना  आर्थिक मदत देण्याची व्यवस्था सरकारने केली असून  काही  लोकांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. उर्वरित अर्ज निकालात काढून ती रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे. पावसाळा जवळ असल्याने घरांची डागडुजी तसंच इतर स्वरूपातील कामं करता यावीत यासाठी  तातडीने ही मदत पुरवली आहे.  ज्यांनी अजूनही अर्ज केलेले नाहीत त्यांनी त्वरित अर्ज करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत आयोजित आर्थिक मदत वितरण समारंभात केलं.

हेही वाचाः दवर्लीत पोलिसांकडून कारवाई; बाजार अखेर बंद

आठ नुकसानग्रस्तांना प्रत्येकील 1 लाखाची मदत

तौक्ते वादळात मोठी हानी झालेल्या आठ नुकसानग्रस्तांना गुरुवारी डिचोलीतील मामलेदार कार्यालयात मुख्यमंत्र्यानी प्रत्येकी एक लाख  रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. या वेळी सभापती राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झाट्ये, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, शंकर चोडणकर, महेश सावंत, दयानंद कारबोटकर आदी उपस्थित होते.

हेही वाचाः आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?, काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांचा कामतांवर घणाघात

शेतकऱ्यांनाही मदत देणार

तौक्ते वादळात शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचा सविस्तर तपशील तयार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे, असं मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितलं. सरकार शंभर टक्के मदत करू शकत नाही.  पण जी मदत करणार आहे त्यातून सर्व नुकसानग्रस्त लोकांना दिलासा मिळेल.  सामाजिक संस्थांनी गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः हायकोर्टानं तरुण तेजपालप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, २ जूनला काय होणार?

दिलासा देणारी मदत

राज्य शासन सर्व घटकांची काळजी घेतंय. यावेळी गोशाळेची हानी झाली. त्यांनाही एक लाख मदत दिली आहे. कोविड काळात वादळाचा तडाखा बसून खूप हानी झाली. मात्र सरकारी यंत्रणेने चांगलं काम करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोविड लस घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावं आणि लसीकरणाला 100 टक्के यशस्वी  करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 न्यायाधीशांची बदली

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

मुख्यमंत्र्यानी दहा दिवसांत मदत देण्याचा शब्द पाळताना  आर्थिक  मदत मंजूर केली आणि लोकांना काहीप्रमाणात दिलासा दिला आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांचे सभापती राजेश पाटणेकर यांनी  आभार मानले. पावसापूर्वी दुरुस्ती करता यावी यासाठी ही तातडीची  मदत मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचं पाटणेकर यावेळी म्हणाले.

हेही वाचाः भारतात अँटीबॉडी कॉकटेलने करोनावर पहिल्यांदाच यशस्वी उपचार, रुग्णाला डिस्चार्ज

मुख्यमंत्र्यानी  नुकसानग्रस्त लोकांना तातडीने मदत केल्याबद्दल आमदार प्रवीण झाट्येंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. प्रवीणजय पंडित यांनी उपस्थितांचं स्वागत केलं, तर अजय गावकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!