विरोध कायम! पंधरा दिवस निघून गेले, मात्र आयआयटीविरोधात आंदोलन सुरुच

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपई : गुळेलीमधील प्रस्ताविय आयआयटी प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा विरोध कायम आहे. 15 दिवस उलटून गेले, तरिही स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. गेल्या जवळपास पंधरा दिवसापासून शेळ मेळावली धडा पैकुळ इत्यादी गावातील नागरिक या प्रकल्पाच्या विरोधात दररोज रस्त्यावर बसून निषेध नोंदवत आहेत. मात्र सरकार दरबारी या आंदोलनाची कुणीही दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या भूमापन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याला विरोध करण्याच्या दृष्टीकोनातून मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले असून ठिय्या आंदोलन करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सरकारने जमीन मोजणीचं काम बंद केलंय.
काय आहे आयआयटी प्रकल्प?
शेळ मेळावली याठिकाणी जवळपास साडेतीन हजार कोटी खर्चिले जाणार आहेत. या पैशांमधून सरकारतर्फे आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे माध्यमातून जमिनी आणि पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे हा प्रकल्प या भागातून हद्दपार करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून या प्रकल्पाला समर्थन मिळण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरलेत. गुळेली पंचायतीच्या माध्यमातून प्रकल्पाच्या संरक्षण कुंपणाला ना हरकत दाखला मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने वेगळीच चाल खेळल्याचा आरोप केला जातो. पंचायत मंडळाकडून सदर प्रस्ताव नामंजूर करून घेतला होता. त्यानंतर आयआयटी व्यवस्थापनाने हा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी पंचायत खात्याकडे आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावावर नुकतीच सुनावणी झाली. पुढील सुनावणी येणाऱ्या काळात होणार आहे.
मात्र हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत ह्या भागामध्ये साकार करू देणार नाही अशा प्रकारचा निर्णय या भागातील स्थानिकानी घेतलेला आहे. यामुळे या प्रकल्पाला अजूनही विरोध असल्याचे समोर आलंय.
गेल्या जवळपास चार महिन्यापासून स्थानिकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अनेक राजकीय पक्षांनी या भागांमध्ये येऊन भीमगर्जना केल्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यावर उतरून सातत्यानं आंदोलन करीत आहेत. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांची मंडळी या भागांमध्ये फिरतच नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे यापक्षांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तिरस्कार निर्माण झालाय.
स्थानिकांचा राजकीय पक्षांना इशारा
यदाकदाचित या आंदोलनाला अधिक तीव्र रुप प्राप्त होईल. मात्र त्यावेळी राजकीय पक्षांची मंडळी या भागांमध्ये येऊन आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्याच शब्दात उत्तर देण्यात येईल. या भागातील आंदोलन हे आमच्या पुरते मर्यादित आहे. त्याला सत्तरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. मात्र काही राजकीय पक्षाची मंडळी या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकारच्या या यंत्रणेशी सेटिंग करण्याचा प्रयत्न करंतय. या आंदोलनाचा फायदा आपल्या राजकीय स्वार्थासाठी जर होत असेल तर अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात धडा शिकविला जाईल.
हेही वाचा –
पंचनामा | आयआयटी प्रकल्पाना नेमका का होतोय विरोध?
‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड
टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?