संरक्षक भिंत स्थानिक मच्छिमारांच्या होड्यांना संरक्षण देण्यासाठी

सरपंच, उपसरपंचांची माहिती; सोशल मीडियातून संरक्षक भिंतीचं बांधकाम वायरल

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भागात जी संरक्षक भिंत बांधली जातेय ती केवळ स्थानिक मच्छिमारांच्या होड्या तसंच खोपींना संरक्षण देण्यासाठी असल्याची माहिती सरपंच वैशाली शेटगावकर तसंच उपसरपंच अमित शेटगावकर यांनी दिली.

हेही वाचाः पेडणेकरांच्या सेवेसाठी मी नेहमीच पुढे असेन

सोसावं लागतं नुकसान

विठ्ठलदास किनारी भागात पारंपारिक पद्धतीने केवळ समुद्रावर अवलंबून असलेले किमान 100 मच्छिमार व्यावसायिकांच्या होड्या आहेत. त्या होड्यांना दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या वेळी धोका निर्माण होऊन त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. बऱ्याचदा मासे पकडण्याची जाळी, होड्या वाहून जातात. सरकार दरवर्षी नुकसग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान देण्याचं आश्वासन देते. असं हे आश्वासन आजवर कागदावरच राहिलंय. सरकारने या व्यावासायिकांच्या समस्या सोडवण्यास आजपर्यंत प्रयत्न केलेले नाहीत. पावसाळ्यात होणाऱ्या वादळात स्थानिकांचं होणारं नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय सरकारी यंत्रणा दुसरं काहीच करत नाही.

हेही वाचाः न्हंयबाग येथे ओमनी कार नदीत बुडाली

‘जेटी’ आजपर्यंत कागदावरच

विठ्ठलदास वाडा मोरजी किनारी स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या होड्यांना आणि झोपड्यांना सुरक्षा देण्यासाठी दरवर्षी सरकार, आमदार जेटी उभारून देण्याचं आश्वासन देतात. मात्र हा विषय आजपर्यंत कागदावरच उरलाय. तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, तत्कालीन मच्छिमार मंत्री विनोद पालयेकर, विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांनीही स्थानिक व्यावसायिकांची भेट घेऊन या ठिकाणी जेटी उभारून देण्याचं आश्वासन दिलं होतं, जे आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. ही जागा पूर्णपणे सीआरझेड कक्षेत येत असल्यानं सीआरझेड विभागाचा परवाना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतंही काम करता येत नाही. सरकारकडून जेटीला परवानगी मिळत नसल्यानं ती सरकारकडून बांधता येत नाही. परवाने नसल्यानं जेटी कशी उभारणार? स्थानिक आमदार, मंत्री काय करणार?

हेही वाचाः विवाहपूर्व काऊन्सिलिंगचा प्रस्ताव सरकारनं गुंडाळला

म्हणूनच उभारली जाते…..

स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की सरकार, आमदार अनेक वेळा किनारी भागात भेटी देऊन आम्हाला जेटी बांधून देणार असं आश्वासन देतात.  आजपर्यंत कोणत्याच सरकारने आमची मागणी पूर्ण केलेली नाही. दरवर्षी आम्हाला नुकसान सोसावं लागतं. त्यासाठी आता आम्हीच व्यावसायिकांनी पदर मोड करून स्थानिक पंचायत आणि स्थानिक पंच सदस्यांना विश्वासात घेऊन किनाऱ्यावर संरक्षक भीत उभारून आमच्या होड्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे. जे काम सरकारने करायचं ते आम्ही करत आहोत. सरकारने आमच्या व्यवसायाला पाठिंबा द्यायला हवा. सरकारकडे आमच्या मुलांसाठी नोकऱ्या नाहीत. समुद्रावर आमचं पोट अवलंबून आहे. दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं.

हेही वाचाः RECRUITMENT | सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अभियंता पदासाठी भरती

सोशल मीडियातून वायरल

किनारी भागात संरक्षक भिंतीचं बांधकाम चालू असल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल करण्यात आलेत.  त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. याविषयी स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही आमच्या पारंपरिक व्यवसायाला सुरक्षा देण्यासाठी केवळ संरक्षक भीत बांधत आहोत, तीही केवळ झोपड्या, होड्यांना सुरक्षा देण्यासाठी, इतर कोणतंही बांधकाम केलं जात नाहीये. सरकारला आम्ही संघटीत होऊन उत्तर द्यायला तयार आहोत. आमच्याच संरक्षक भिंतीला जर कुणी हरकत घेत असेल, तर त्यांनी राज्यातील पूर्ण किनारी भागात नजर मारून पहावी, की किती मोठमोठी बांधकामं किनारी भागात बाहेरील व्यावासायिकांनी उभारली आहेत. त्यातून व्यवसाय करून करोडो रुपये कमावलेत. त्या बांधकामांना सीआरझेड विभागाचे परवाने आहेत का?, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींची संख्याही घसरली

होड्यांना लावली होती आग

आठ वर्षांपूर्वी विठ्ठलदास वाडा येथील एका स्थानिक जमीनदाराने आपल्या जमनीत होड्या ठेवल्या होत्या म्हणून होड्यांना आग लावली होती. त्यावेळी मच्छिमारांचं 12 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. आजपर्यंत या नुकसानग्रस्त व्यावासायिकांना कुणीच मदत केलेली नाही. स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांना कॅप्टन ऑफ पोर्टच्या जमिनीत पूर्ण अधिकार आहे. त्या ठिकाणी होड्या ठेवणं, झोपड्या उभारणं हे काम ते करू शकतात. त्यांच्या व्यवसायावर आता पर्यटन व्यवसायाने गदा आणली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!