आधी रुग्णांना जीवाची सुरक्षा द्या, मग पत्रकार-विरोधकांना दोष

काँग्रेसचे प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा यांची आरोग्य सचिव रवी धवन यांच्यावर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आज जीएमसीत रुग्णांना खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणं मिळणार की नाहीत याबद्दल लोकांच्या मनात शंका आणि भय आहे. सुपरस्पेशलीटी ब्लॉकच्या एका वॉर्डचं छप्पर कोसळल्यानंतर आणि वॉर्डात पाणी घुसल्यानंतर सदर इमारतच खाली येणार नाही ना, असा भय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आरोग्य सचिव रवी धवन यांनी लोकांना खाटा, उपकरणं आणि जीवाच्या सुरक्षेची हमी द्यावी आणि मगच पत्रकार तसंच विरोधकांना दोष द्यावा असं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः गोवा हॉर्टिकल्चर दुकानांवर आता भाजीपाला उपलब्ध होणार नाही?

इतरांना दोष न देता सत्याला सामोरं जावं

गोमेकॉतील गलथान कारभार आणि कोविड हाताळणीत सरकारला आलेले अपयश यावर सारवासारव करुन सरकारची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य सचिवांचा आम्ही निषेध करतो. गोमेकॉत पहाटे २ ते ६ या वेळेत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यु होतात हे खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मान्य करुन त्यावर जाहीर वक्तव्य केलं होतं. आता आरोग्य सचिवांनी इतरांना दोष न देता सत्याला सामोरं जावं आणि आरोग्यमंत्र्यांकडून नीट माहिती करुन घ्यावी. गोमेकॉतील पहाटेचे मृत्यु हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न झाल्याचं सांगून एक प्रकारे आरोग्य सचिवांनी उच्च न्यायालयात सरकारनेच मान्य केलेल्या माहितीच्या अगदी विरोधात भूमिका घेतली आहे, असं तुलीयो डिसोझा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा

आपल्या कर्मांचं खापर दुसऱ्यांच्या माथी फोडू नका

गोमेकॉत तसंच इतर हॉस्पिटलात जर वेळेवर खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणं आणि यंत्रणा, औषधं उपलब्ध असणार याची पूर्ण हमी सरकारने द्यावी तसंच रुग्णांना खुर्ची, स्ट्रेचर आणि जमीनीवर झोपवून उपचार देणार नाही याची खात्री आरोग्य सचिव रवी धवन यांनी दिल्यास काँग्रेस पक्ष लोकांना हॉस्पिटलात दाखल करुन घेण्यासाठी खास अभियान सुरू करण्यास तयार असल्याचं तुलीयो डिसोजा यांनी सांगीतलं. आज भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने संपूर्ण आरोग्यसेवा यंत्रणा कोसळली असून सरकार मात्र इतरांकडे बोट दाखवून आपल्या कर्मांचं खापर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचाः कोविड-19 संदर्भातल्या मंत्री गटाची 26 वी बैठक संपन्न

याला जबाबदार कोण?

कोविड केअर सेंटर असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी काचा कोसळल्या, त्यावर सरकारने काय कारवाई केली? दोन दिवस अगोदर कार्यांवित केलेल्या गोमेकॉतील सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या वॉर्डाचं छप्पर कोसळलं आणि आत पाणी शिरलं, त्याला कोण जबाबदार आहे, यावर आरोग्य सचिवांनी भाष्य करावं. आज भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असून, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं धाडस नसल्यानंच आता सरकारी अधिकाऱ्यांना त्यानी पुढे केलं आहे असं तुलीयो डिसोजा म्हणाले.

हेही वाचाः ‘म्युकरमायकोसिस’चा गोव्यात शिरकाव; जीएमसीत सापडले सहा रुग्ण

जीएमसीतील अनागोंधी कारभार उघड

जीएमसीतील कोविड वॉर्डातील अनागोंधी कारभाराचं दर्शन घडविणाऱ्या अनेक चित्रफीती आज समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तडफडणारे कोविड रुग्ण संपूर्ण गोव्याने पाहिले आहेत. गोमेकॉतीस स्वच्छता गृहांची दारुण अवस्था आणि सगळीकडे पसरलेलं घाणीचं साम्राज्य लोकांनी बघितलं आहे. आता सरकारची बाजू घेऊन इतरांना दोष देणाऱ्या आरोग्य सचिवांनी हे सगळं खोटं आहे का ते सांगावं, अशी मागणी तुलीयो डिसोजा यांनी केली आहे.

हेही वाचाः म्युकरमायकोसिसः ब्लॅक फंगसचे संक्रमण का होत आहे?

जीएमसीत मृतदेहांच्या हाताळणीत लुटमार

सरकारने आता वेळ न घालवता कोविड व्यवस्थापनासाठी कृती दलाची स्थापना करावी. सरकार आज रुग्णांना चांगले उपचार देण्यास अपयशी ठरलंच आहे. त्याबरोबर मृतांवर वेळेत अंत्यसंस्कार करू देण्यासही आडकाठी आणीत आहे. जीएमसीत मृतदेहांच्या हाताळणीत लुटमार सुरू असून, वॉर्डातून शवागारात आणि शवागारातून हर्स व्हॅनीत मृतदेह हलविण्यासाठी लोकांकडून पैसै लुटले जात आहेत. परंतु सरकारचं यावर लक्ष नसून, आरोग्य सचिवांनी यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!