तिलारीचं पाणी पाईपलाईनद्वारे आणण्याचा प्रस्ताव

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोली : तीस वर्षं होत आली तरी अजूनही गोव्याला तिलारी धरणाचे पाणी नियमित मिळत नाही. महाराष्ट्र हद्दीत कालवे फुटून पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडताहेत. या पार्शवभूमीवर गुरुवारी गोवा व महाराष्ट्र सरकारच्या तिलारी प्रकल्प स्टँडिंग कमिटीची संयुक्त बैठक झाली. तिलारी धरण ते गोवा हद्द या दरम्यान २३ किलोमीटरची पाईपलाईन घालून प्रश्न निकालात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
हेही वाचाः SUCCESS STORY | ‘प्रिन्सेस ऑफ गोवा’ साची सावंतसोबत खास बातचीत
समस्या सोडवण्याची हमी
कोलवाळ येथील तिलारी विश्रामगृहात गुरुवारी दोन्ही राज्यांच्या अधिकारीवर्गाची तसंच स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी कोकण जलस्रोत विकास महामंडळाचे मुख्य अभियंता संतोष तिरमानवर, गोव्याच्या जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता श्रीकांत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गोव्याकडून तिलारी धरणाचं पाणी नियमित न मिळणं, वारंवार कालवे फुटून पाणी वाया जाणं, शेतीचं नुकसान, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणं आदी समस्या मांडण्यात आल्या. महाराष्ट्र अधिकारीवर्गाने यापुढे काळजी घेण्याची हमी दिली. गोव्याला नियमित जलपुरवठा करता यावा यासाठी धरण ते गोवा हद्द दरम्यान जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली. या बैठकीत धरणग्रस्त पुनर्वसनाचा मुद्दाही ही चर्चेला आला. जमिनीची मालकी, एक चौदा उतारे विषय सोडवणं तसंच रस्ता, वीज, पाणी विषयीच्या समस्या सोडवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
हेही वाचाः Viral | मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यावर गडकरींचा तो व्हिडीओ व्हायरल
पाईपलाईनद्वारे तिलारीचं पाणी घेणं सोयीचं : मुख्यमंत्री
तिलारी धरणाचं पाणी अनियमित असल्यानं ते नियमित करण्यासाठी २३ किलोमीटर लांब जलवाहिनी टाकण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी या प्रस्तावाचा विचार केला होता. तिलारी धरण ते गोवा हद्दीपर्यंत जलवाहिनी टाकून पाणी घेतलं तर कोणताही अडथळा होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.