भ्रष्टाचार दूर करून पारदर्शकतेला प्रोत्साहन द्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि उत्तम सेवा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आणि मानवी विकास साधण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची गरज व्यक्त केली.

दक्षता संचालनालयातर्फे सचिवालयातील परिषद गृहात इंडिपेंडंट इंडिया@75 सेल्फ रिलायन्स विथ इंटीग्रेटी या संकल्पनेवर दक्षता जागृती सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी एकात्मतेच्या प्रतिज्ञेचे महत्त्व प्रतिपादले आणि सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या कारकिर्दीत त्याचे पालन करण्याचे आवाहन केले.

गोवा एक आदर्श राज्य

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचे महत्व प्रतिपादून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत नुकतेच सर्व स्वयंपूर्ण मित्र आणि सर्व सात लाभार्थ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी सातही लाभार्थींचे व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आणि गोवा देशाच्या इतर भागांसाठी एक आदर्श राज्य म्हणून उदयास येत आहे असे सांगितले.

मुख्य सचिव परिमल राय, आयएएस यांनी यावेळी सरकारचे सचिव, खात्यातील प्रमुख आणि दक्षता अधिकाऱ्यांना एकात्मतेची शपथ दिली. सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल ज्यांच्या जयंतीनिमित्त दक्षता सप्ताह पाळण्यात येतो त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचेही मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत समर्पित सेवेसाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. दक्षता प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गोवा @60 आणि आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना आम्ही मानवी विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले. मानव विकासाचे काम करताना आपण भ्रष्टाचार बाजूला ठेवून तसेच जात, पात, धर्म, बाजुला सारून काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

मुख्य सचिव आयएएस परिमल राय, प्रधान सचिव आयएएस पुनीत कुमार गोयल, पोलीस अधीक्षक सेराफिन डायस, दक्षता खात्याचे संचालक संजीव सीजी देसाई आणि खास सचिव आयएएस अंकिता आनंद यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीस दक्षता संचालक संजीव सी जी देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेराफिन डायस यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!