धक्कादायक! खासगी हॉस्पिटलमधील कोविडबाधित मृतांची माहिती लपवली…

कोविडमुळे मृत्यू झालेल्या 67 जणांची माहिती 9 महिन्यांनी उघड

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोविडबाधित झाल्यामुळे योग्य आणि जलद उपचार मिळावेत, यासाठी अनेक सधन नागरिक खासगी इस्पितळात धाव घेतात. मात्र अशांची झोप उडवणारी बातमी पुढे आलीय. खासगी इस्पितळात कोविडमुळे मृत्यू झालेल्या 67 जणांची माहिती 9 महिन्यांनी उघड झाल्यानं खळबळ माजलीय. ही माहिती लपवल्यानं आता संबंधित खासगी इस्पितळांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

खासगी इस्पितळांची लबाडी उघड

खासगी इस्पितळांत कोरोनाबाधितांवरील उपचाराची प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. कधी वाढीव शुल्कामुळे, तर कधी उपचारांनंतरही होणार्‍या मृत्यूमुळे खासगी इस्पितळे टीकेची धनी बनली. मात्र यातून बोध न घेतल्यामुळे राज्यातील काही खासगी इस्पितळांचे बिंग फुटले आहे. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 67 जणांचा खासगी इस्पितळात मृत्यू झाला, ज्याची माहिती उघड करण्यात आली नव्हती. ही माहिती आता 9 महिन्यांनंतर उघड झाल्यामुळे खासगी इस्पितळांची लबाडी उघड झालीय. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

कारवाईची टांगती तलवार

काही खासगी इस्पितळांचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यात या नव्या प्रकाराची भर पडली आहे. राज्य सरकारने असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा थेट इशारा यापूर्वीच दिला होता. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही म्हटले होते. त्यामुळे या मृत्यू प्रकरणातील खासगी हॉस्पिटल्स सरकारी यंत्रणेच्या रडारवर आली आहेत.

हॉस्पिटल्सच्या नावांबाबत उत्सुकता

5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 या कालावधीत खासगी इस्पितळात मृत्यू आलेल्या 67 कोरोनाबाधितांची आता नोंद करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला. ही इस्पितळे कुठली, त्यांची नावे काय, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण 2 हजार 840 जणांचा कोविडमुळे बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे 13 जणांचा मृत्यू झालाय. 10 जणांचा गोमेकॉत, तर तिघांचा दक्षिण गोवा इस्पितळात मृत्यू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!