प्रवाशांविना पणजी बसस्थानक सामसूम

प्रवासी नसल्यानं खासगी बसेस बंद; सुदीप ताम्हणकरांची माहीती; चालक, वाहकांच्या पगारात कपात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील तीन दिवसीय लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा व्यवहार सुरळीत झाले असले तरी खासगी बसेस बंद आहेत. राज्यभरात 25 खासगी बसेस सुरू केल्या होत्या. प्रवाशांअभावी त्यापैकी पणजी – म्हापसा मार्गावर सोमवारी पाच बसेस बंद कराव्या लागल्या. त्यामुळे राज्यात केवळ 20 बसेस सुरू होत्या, असं अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः कोरोना काळात काम करा आणि मिळवा सरकारी नोकरी! ‘ही’ आहे अट

कोरोनामुळे प्रवाशांची बसप्रवासासाठी टाळाटाळ

लॉकडाऊन नसले, तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवासी बसमध्ये येण्याचं टाळत आहेत. प्रवासी नसल्यानं बसेस बंद ठेवाव्या लागत आहेत. आम्हाला बसेस बंद ठेवायच्या नाहीत, मात्र परिस्थितीच तशी आहे. बसमालकांना प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांचे हाल होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः वॉर अगेंन्स्ट कोविड-19 ; कोविड कृती दल हवं

खासगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती

राज्यात 1 हजार 425 खासगी बसेस सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवतात. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्यानं मागील काही दिवसांपासून यापैकी राज्यभरात केवळ 90 ते 100 बसेसच कार्यरत होत्या. खासगी बसेसच्या प्रवाशांमध्ये सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, त्यांचे पालक यांची संख्या मोठी आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं सरकारी खात्यांमध्येही 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती, असा नियम लागू केला आहे. तर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या सर्वाचा प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. बहुतेक प्रवासी स्वत:चं वाहन घेऊन येतात किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना कामाच्या ठिकाणी पोचवतात. कोरोनाच्या भीतीने बहुतेक लोक बसमधून प्रवास करण्याचं टाळतात. त्यामुळे रोजचा डिझेलचा खर्चही निघणं कठीण बनलं असल्यानं चालक तसंच वाहकांच्या पगारातही 50 टक्के कपात करण्यात आल्याचंही ताम्हणकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!