खासगी बसमालक आक्रमक, वाहतूक संचालकांना निर्वाणीचा इशारा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : राज्यातील खासगी बसमालकांनी अंतर्गत मार्गांवर बसेस पुन्हा सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. वाहतूक खाते आणि मुख्य सचिवांना निवेदन देत 22 नोव्हेंबरची मुदत दिलीय. बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक बंद झाली. गोव्यातल्या खासगी बसेस बंद झाल्या. आता लॉकडाउन उठवलं, तरी बसेस सुरू करायला सरकारचं वाहतूक खातं परवानगी देत नाही. बसमालक आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेत. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. खासगी बस वाहतूक सुरू करण्यासाठी सरकारने 22 नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही करावी. अन्यथा 23 नोव्हेंबरला वाहतूक संचालकांना घेराव घालण्याचा इशारा बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी दिलाय.
वाहतूक संचालक राजन सातार्डेकर आमच्या मागणीची दखल घेत नाहीत. सरकार दरबारी चर्चेसाठी कसलाही दिलासा मिळत नाही. बसमालक आणि त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणार्यांची उपासमार होत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून बसवाहतूक सुरू करण्यासााठी आदेश द्यावेत. अन्यथा बसमालकांना आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही, असा इशारा सुदीप ताम्हणकर यांनी दिलाय.