आंबोली पोलिसांनी घेतली सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉची ‘विकेट’ !

ई पास नसताना जीवाचा गोवा करायला निघाला होता पृथ्वी शॉ !

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : लॉकडाऊनची पर्वा न करता मौज, मजा, मस्तीसाठी बाहेर पडून गेल्या वर्षी दिवाण हौसिंग फायनान्सच्या दिवाण बंधूंनी क्रेडीट घेतलं होतं. यावर्षी भारताचा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा बातमीत झळकलाय. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला जाणीव नसल्यामुळेच कोणतीही परवानगी आणि नियमांचे पालन न करता फिरणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवले. तो आपल्या सहकाऱ्यांसमवेत गोव्याला निघाला होता. परंतु कोणताही पास नसताना तो मुंबईहुन चक्क आंबोलीपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना आला. त्यामुळं महामार्गावरच्या पोलीस तपासणी यंत्रणेचं कौतुक करावं, तेवढं थोडं आहे. आंबोली पोलिसांनी मात्र त्याला अडवलं. सुमारे तासभर फोनाफोनी आणि ई पास आल्यावर त्याला सोडण्यात आलं.

आयपीएलचा १४ वा हंगाम कोरोनामुळ स्थगित करण्यात आलाय. स्पर्धेतील फक्त २९ सामने खेळवण्यात आल्यामुळ भारतीय क्रिकेटपटूंना मोठा वेळ उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड झाली नाही. त्यामुळं पृथ्वीकडंही बराच मोकळा वेळ आहे. या मोकळ्या वेळी त्यानं फिरायला जाण्याचा बेत आखला. नियमित विमान सेवा कोरोनामुळे बंद आहे. यामुळेच त्यानं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर-कोकण असा मार्ग निवडला. गाडीतून निघालेल्या पृथ्वीच्या सहलीला मोठा सेटबॅक तेव्हा बसला, जेव्हा आंबोली पोलिसांनी त्याला अडवले आणि ई-पासची विचारणा केली. राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीकडे ई-पास गरजेचा आहे. तसा ई-पास पृथ्वीकडं नव्हता. ई-पास असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, असे त्याला पोलिसांनी सांगितले. यावर त्याने पोलिसांना गोव्यात जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. पण पोलिसांनी नकार दिला. गोव्यात जाण्याच्या तयारीने बाहेर पडलेल्या पृथ्वीनं फोनवरून ई-पाससाठी अर्ज केला. त्यानंतर काही तासांनी जेव्हा पृथ्वीला पास मिळाला, तेव्हा पोलिसांनी त्याला गोव्याला जाण्याची परवानगी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!