तयारी विधानसभेची : भाजपा कार्यकर्त्यांवरील 5000 खटले योगी घेणार मागे

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही महिन्यात म्हणजेच २०२२ रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाने सुरुवात केलीय. निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याआधी पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारने घेतला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने घेतलाय. या निर्णयाअंतर्गत ५००० हून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचं ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचं सरकार असतानाच आंदोलन आणि धरणं आंदोलन करणाऱ्यांविरोधात राजकीय हेतूने दाखल करण्यात आलेले तसेच खोटे आरोप करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येणार असल्यांच सांगण्यात आलं आहे. सपा आणि बसपाच्या कार्यकाळात भाजपा कार्यकर्त्यांवरोधात दाखल केलेले ५००० हून अधिक खटले मागे घेण्यात येणार आहेत. जुलै महिन्यापर्यंत हे सर्व खटले मागे घेण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्यात. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष राधा मोहन सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री ब्रिजेश पाठक यांनी, ही सामान्य प्रक्रिया आहे. हे खटले राजकीय हेतूने किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले, या सर्व खटल्यांचा अभ्यास करुन आम्ही असे खटले मागे घेण्याचा निर्णय़ घेतलाय आणि ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. यापूर्वीही उत्तर प्रदेश सरकारने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी न्याय विभागाकडून पाठिंबा मागितला होता. निवडणुकींचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना समाधानी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!