राजधानीत जानेवारीपासूनच मान्सूनपूर्व कामं सुरू

महापालिकेकडून स्वतःचेच १२ कामगार नियुक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : येणारा मान्सून राजधानीसाठी सुसह्य व्हावा म्हणून महापालिकेने मान्सूनपूर्व कामं आतापासूनच सुरू केलीत. या कामांसाठी महापालिकेने स्वतःचेच १२ कामगार नियुक्त केलेत. पाच महिने आधीच ही कामे सुरू केलीत. चर्च स्क्वेअरमध्ये कामत हॉटेलजवळ गटार उपसण्याचे काम सोमवारी सुरू झालं. या कामासाठी महापालिकेने स्वतःचेच १२ कामगार नियुक्त केलेत. एरव्ही मार्चमध्ये निविदा काढल्या जायच्या. त्यानंतर एप्रिलच्या मध्यास कामे सुरू व्हायची आणि मेमध्ये मान्सूनपूर्व पाऊस धडकल्यानंतर अनेक कामे अर्धवट राहत असत. यावर्षी ही समस्या उद्भवणार नाही, असा दावा केला जात आहे. महापालिकेच्या सर्व ३० ही प्रभागांमध्ये येत्या मेपर्यंत गटारे उपसणे, नाल्यांची साफसफाई तसेच अन्य मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले महापौर?

मान्सूनपूर्व कामांविषयी बोलताना महापौर उदय मडकईकर म्हणाले की…

पावसाळ्यात शहरातील १८ जून रस्ता, मळा भागात तसेच बाजारपेठेत काही भागात पाणी तुंबते. १८ जून रस्त्यावरील गटारे साफ करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. दरवर्षी निविदा काढून बाहेरचे कामगार घेऊन आम्ही मान्सूनपूर्व कामे करीत होतो. त्यासाठी व २० ते २५ लाख रुपये खर्चाचा अतिरिक्त भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत असे. महापालिकेकडे स्वतःचे कामगार उपलब्ध असतानाहा अतिरिक्त भार का म्हणून सहन करावा, अशी भूमिका आता महापालिकेने घेतली आहे.

शहरात ठिकठिकाणी ५०० कचरापेट्या!

महापालिकेने आणखी एक पाऊल उचलताना शहरात ठिकठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था केली आहे. सुमारे ५०० कचरापेट्या जागोजागी ठेवल्या जाणार आहेत. पर्यटक तसेच अन्य लोक मिनरल वॉटर, शीतपेये किंवा अन्य प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गटारामध्ये फेकतात. त्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबतात. गटारातील पाणी रस्त्यावर येते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. तसेच लोकांना यामुळे मोठा त्रासही होते. शिवाय प्लास्टिक पिशव्यांचाही अशाच प्रकारचा उपद्रव होतो. त्यामुळे जागोजागी कचरापेट्या ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसेच बाहेर कचरा न फेकता या कचरा पेट्यांमध्ये तो फेकावा, असे आवाहनही महापालिकेने जनतेला केले आहे.

स्वच्छ गोवा, सुंदर गोवा

पर्यटकांनी प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या या कचरापेट्यांमध्ये टाकल्या, तर गटारे तुंबण्याचे प्रकार कमी होतील. शिवाय यामुळे कचरा समस्येचे प्रमाण काही अंशी कमी होईल. गोव्याकडे निसर्ग सौंदर्याचा जो अमनोल ठेवा आहे, तो जपण्याची गरज आहे. किंबहुना ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!