काँग्रेसची ‘प्रतिमा’ आपमध्ये विलीन

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांना हादरा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात एकीकडे प्रचंड नैराश्य आणि नकारात्मकतेत बुडालेल्या काँग्रेसला काही प्रमाणात जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. एवढंच नव्हे तर प्रतिमा कुतिन्हो यांनी थेट दिल्लीत जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे गोव्याचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. गोव्यात आप हा निश्चितपणे बदल घडवून आणणार आहे, असा विश्वास प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केलाय.

गिरीश चोडणकरांना हादरा

काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर सध्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा वरचष्मा आहे. विधीमंडळ गट आणि काँग्रेस समिती यात बराच अंतर्गत वाद आहे. काँग्रेसला सध्या अध्यक्षपदासाठीही योग्य उमेदवार सापडत नाही. गिरीश चोडणकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद ठेवण्यात आलंय. जिल्हा पंचायतीनंतर अलिकडेच झालेल्या नगरपालिका निवडणूकांत काँग्रेसची कामगिरी खूपच निराशाजनक ठरल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाला बरेच कंटाळलेत. गिरीश चोडणकर यांच्या गटातील सहकारी अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, जनार्धन भंडारी, विजय भिके आदी काही मोजकेच नेते आवाज काढताहेत. बाकीच्या कुणाला काहीच पडलेलं नाही. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांचे गिरीश चोडणकर यांच्यासोबत बिनसल्याने त्यांनीही मौन धोरण स्विकारलंय. एकीकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यामार्फत गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत आघाडी करू पाहत आहे, तर दुसरीकडे गिरीश चोडणकर यांचे समर्थक मात्र या आघाडीत कोलदांडा घालण्याच्या प्रयत्नात आहे. या एकंदरीत परिस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र कुणीच वाली राहीलेला नाही. आता प्रतिमा कुतीन्हो यांच्या राजीनाम्यामुळे गिरीश चोडणकर यांच्या गोटाला मोठा हादरा बसलाय.

नावेलीचा पराभव जिव्हारी लागल

राज्यात एकीकडे भाजपविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यात नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघ हा काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्या अखत्यारित येतो. एवढं करूनही तिथे अपक्ष उमेदवाराला विजय होऊन प्रतिमा कुतिन्हो यांचा पराभव होणे ही काँग्रेस पक्षासाठी मोठी नामुष्कीच ठरली. हा पराभव प्रतिमा कुतिन्हो यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. अंतर्गत कलह आणि गटबाजी यातून काँग्रेस पक्षाची सुटका होणं अशक्य आहे आणि तिथे कितीही प्रामाणिकपणे काम केलं तरी काहीही उपयोग नाही, हे लक्षात आल्यामुळेच प्रतिमा कुतिन्हो यांनी आपमध्ये आता आपल्या राजकीय भवितव्याची वाट चालण्याचं ठरवलंय.

आपला मिळणार बळकटी

दिल्ली मॉडेल गोव्यात राबवण्यासाठी प्रचंड ताकद पणाला लावलेल्या आम आदमी पार्टीला गोव्यात नेतृत्व करणारा एकही नेता सापडलेला नाही. त्यांच्याकडून बरेच प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पंचायत निवडणुका आणि नगरपालिका निवडणुकांत त्यांनी उतरवलेल्या उमेदवारांना काही प्रमाणात मतं मिळू लागलीत. नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणूकीत आप तिसऱ्या स्थानावर आलाय. या अनुषंगानेच प्रतिमा कुतिन्हो यांच्या प्रवेशामुळे पक्षाला गती मिळण्याची आशा आहे. प्रतिमा कुतिन्हो या एक एक्टीव राजकीय महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. अशा पद्धतीच्या सक्रीय राजकीय सहभागाचीच आपला गरज आहे. प्रतिमा कुतिन्हो या कट्टर काँग्रेसपैकी एक समजल्या जातात आणि त्यांनीच आता आपची झाडू हातात घेतल्याने प्रखर विरोधकाची भूमिका वठवताना हीच झाडू आता काँग्रेसचा राज्यात सफाया तर करणार नाही,असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करताहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!