ही रे कसली दिलगिरी…! प्रथमेशच्या दिलगिरीवर पेडणेकर नाखूष

खुल्या दिलाने माफी हवी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : सुप्रसिद्ध मॉडेल आणि माजी फुटबॉलपटू प्रथमेश मावळिंगकर याने अखेर पेडणेकर आणि पेडणेकरी भाषेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीप्पणीबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. पण ही दिलगिरी मात्र त्याने आपल्या वेगळ्याच स्टाईलमध्ये दिलीय. पेडणेकर मात्र या दिलगिरीवर नाखूष आहेत. आपल्या कृतीबद्दल पेडणेकरांना काहीच हरकत नाही तर काही ऍक्टीव्हीस्ट आणि तथाकथित राजकीय नेते पेडणेतील युवकांचा वापर करून विनाकारण या विषयाचा बाऊ करीत असल्याचे चित्र प्रथमेशने आपल्या नव्या व्हिडीओतून तयार केलंय.

बघा प्रथमेश काय म्हणाला…

ही तर केवळ थट्टामस्करी

आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर केलेली टीप्पणी हा केवळ विनोद होता, असं प्रथमेशचं म्हणणं आहे. आपल्या मित्रासोबत मस्करी आणि थट्टा करताना आपण सहजपणे हे बोलून गेलो. तो माझा मित्र साधारणतः दहा वर्षांपासून आहे आणि आम्ही एकमेकांशी खेळी-मेळीत संवाद साधत होतो. हा प्रकार आज संपूर्ण गोव्यात एक मोठा वादाचा विषय ठरला. तो व्हिडीओ खरं म्हणजे आता युट्यूबवर देखील नाही. काही लोकांना तो व्हिडीओ वाईट वाटला आणि त्यामुळे आपण त्याच दिवशी तो काढून टाकला, असं ही तो म्हणाला.

पेडणेतील युवकांचा वापर

या एकूणच प्रकारावरून पेडणेतील युवकांचा राजकीय नेत्यांकडून गैरवापर केला जातोय, असा आरोप प्रथमेशने केलाय. हा गैरवापर त्यांच्या वैयक्तीक फायद्यासाठी केला जातोय. आम्ही युवक आहोत. आम्ही गोव्याचे युवक आणि भवितव्य आहोत, असंही तो म्हणालाय. स्वतः युट्यूबवर मास्कचा वापर करताना दिसत नसला तरी प्रथमेशने आपल्या या प्रकरणात मात्र मास्कचा विषय उपस्थीत केलाय. त्याचा निषेध करण्यासाठी जमलेल्यांनी मास्क घातला नाही याचं आपल्याला खूप वाईट वाटलं, असेही त्या म्हणाल्या. या एकूणच प्रकारामुळे संपूर्ण गोव्याचे नुकसान होता कामा नये असे आपल्याला वाटते, असं म्हणून जर कुणाला आपण दिलगिरी व्यक्त करावी,असं वाटतंय तर मी गोव्याच्या प्रत्येकाची दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असंही तो म्हणालाय.

पाहा व्हिडीओ –

नवप्रभातील अग्रलेखांत उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांची उत्तर प्रथमेशकडे आहेत का?

कोणतीही भाषा, कोणतीही बोली ही कधीही कनिष्ठ अथवा श्रेष्ठ नसते. एखादी गरीब, कष्टकरी माणसांची बोली आहे म्हणून ती हीन ठरत नाही आणि एखादी बोली समाजातील उच्चभ्रूंची बोली आहे म्हणून श्रेष्ठ ठरत नाही. प्रत्येक बोलीभाषेला तिचा असा एक लहेजा असतो, तिची सौंदर्यस्थळे असतात. पेडण्याच्या बोलीलाही तिची लय आहे, तिचा हेल आहे, तिचा गोडवा आहे. आपली बोलीभाषा कोणी अभिमानाने बोलत असेल तर त्याची टवाळी होता कामा नये. उलट आपली, आपल्या वाडवडिलांची बोली सोडून हट्टाने जर कोणी स्वतःला इतरांपेक्षा पुढारलेला भासवण्यासाठी उच्चभ्रूंची भाषा बोलण्याचा दुराग्रह बाळगत असेल तर त्यातून खरे त्याचे हसे होत असते. आपली स्वतःची, वाडवडिलांची बोली बोलण्यात लाज कसली?

– अग्रलेख, नवप्रभा

हेही वाचा – ‘व्हाट्सअ‍ॅप पे’च्या भारतातील प्रमुखपदी गोमंतकीयाची वर्णी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!