नगरगाव सरपंचपदी प्रशांत मराठे

बिनविरोध निवड. जुने रस्ते पक्के करण्यासह पंचायत टँकरमुक्त करण्यासाठी करणार प्रयत्न.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

सत्तरी : नगरगाव पंचायतीच्या सरपंचपदी प्रशांत मराठे (Prashant Marathe) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी पंचायत निवडणुकीपर्यंत मराठे सरपंचपदी असतील. आपल्या कार्यकाळात पंचायत क्षेत्रातील विकासकामांसह पंचायत टँकरमुक्त करणं, मोबाईल नेटवर्क उपलब्ध करणं, म्हादईप्रश्नी सरकारला पाठिंबा व अन्य समाजोपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर राहणार, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.

सर्व पंचांनी एकमताने प्रशांत मराठे यांच्या नावाला पसंती दिली. त्यांच्यासह स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे मराठे यांनी आभार मानले. सरपंच म्हणून खूप कमी कार्यकाळ मिळाला असला, तरी या काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मेहनत घेणार असल्याचं मराठे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात नेटवर्कची समस्या येते. ती सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावातील जुने रस्ते पक्के करण्याचा प्रयत्न राहील. म्हादई नदीचा प्रवाह नगरगाव पंचायतक्षेत्रातून जात असल्यानं सरकारच्या पाठिशी पंचायत मंडळ खंबीरपणे उभं राहील, असं ते म्हणाले. गावातील विकासकामांना गती देण्याबरोबरच सर्वांना सोबत घेउन काम करणार असल्याचं मराठे यांनी सांगितलं.

पंचायत टँकरमुक्त करण्यावर भर
नगरगाव पंचायत क्षेत्रातील काही भागांत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवते. यावर विशेष लक्ष देण्यात येईल. 25 एमएलडीचा जलप्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे. तो पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या भागांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो, तिथं पाणी पुरवून पंचायत टँकरमुक्त करणार असल्याचा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!