प्रकाश जावडेकर सहलीसाठी नव्हे, शेतकऱ्यांसाठी गोव्यात!

भाजपचा काँग्रेसवर निशाणा. युवा काँग्रेसने गोव्याची बदनामी केल्याचा आरोप.

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) सहलीसाठी गोव्यात आलेले नाहीत. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते गोव्यात आले आहेत. युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करून गोव्याची देशभर बदनामी केली, असा आरोप भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक (Dattaprasad Naik) यांनी केला.

पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस गजानन तिळवे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे अनेक नेते अनेकवेळा गोव्यात येतात. पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहतात. पण भाजपने आतापर्यंत कधीच त्यांना तेथे जाऊन वाईट वर्तणूक दिलेली नाही. पण काँग्रेसने हद्द ओलांडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात नाटक केले, त्याचप्रकारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरही गोव्यात नाटक करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

म्हादईबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट आहे. म्हादईबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना जावडेकर यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तरीही काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करीत आहे, असेही नाईक यांनी नमूद केले.

कायदा हाती घेण्याचा प्रयत्न!
रात्रीच्यावेळी हॉटेलात जमून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कृत्य निंदनीय आहे. असे कृत्य करून त्यांनी कायदा हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी दत्तप्रसाद नाईक यांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!