या ‘सेंटिंग’साठीच मंत्री जावडेकर गोव्यात!

गोवा फॉरवर्डच्या या नेत्याचा आरोप; प्रोग्रेसिव्ह फ्रंटकडून मंत्र्यांचा धिक्कार

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हादई आणि मोलेच्या ‘सेटिंग’साठीच गोव्यात आले आहेत. म्हादईचा सौदा करण्याच्या षडयंत्रात तेच मूख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं गोमंतकीय जनतेनं जावडेकरांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असा सल्ला गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) उपाध्यक्ष दुर्गादास कामत (Durgadas Kamat) यांनी दिला.

या तिघांनी घोटला म्हादईचा गळा
प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवानं पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत फ्रंटचे पदाधिकारी अॅड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे तसेच जिना परेरा उपस्थित होत्या. म्हादईबाबत प्रकाश जावडेकर नेहमीच गोमंतकीयांची फसवणूक करीत आले आहेत. कर्नाटकला कळसा-भांडुरासाठी परवानगी पत्र देणं, प्रकल्प चालीस लावून म्हादईचं पाणी वळवण्यास सहकार्य करणं आदी गोष्टी जावडेकर यांनीच केल्या. पण नंतर मात्र हात वर केले. जावडेकर, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) या तिघांनी नियोजनबद्धरीत्या म्हादईचा गळा घोटला, असा आरोप कामत यांनी केला. म्हादई वाचविण्यासाठी यापुढं विरोधी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना संघटितरीत्या आंदोलनं छेडतील, असेही त्यांनी नमूद केलं.

पाण्याविना शेती कशी करायची?
20 नोव्हेंबर 2019 रोजी प्रकाश जावडेकर यांनी आम्हाला म्हादईप्रश्नी गोव्याचे हित जपण्याची हमी दिली होती. पण दिलेलं आश्वासन त्यांनी अजिबात पाळलं नाही. त्यामुळं त्यांचा निषेधच नव्हे, तर आम्ही धिक्कार करतो, असं महेश म्हांबरे (Mahesh Mhambrey) म्हणाले. म्हादई आणि मोले प्रश्नास मंत्री जावडेकर हेच जबाबदार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून जावडेकरांनी त्यांना कृषी विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. पण म्हादई, दूधसागर नष्ट झाल्यास शेतकरी शेती करणार कसे, याचा विचार मात्र त्यांनी किंवा भाजप सरकारनं केला नाही. त्यामुळे त्यांच्या आश्वासनांना गोमंतकीय जनतेनं बळी पडू नये, असं आवाहनही म्हांबरे यांनी केलं.

तर आम्ही गप्प बसणार नाही…
गोव्याचं अस्तित्त्व नष्ट करणारे प्रकल्प गोमंतकीयांना नको आहेत, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने लक्षात घ्यावं. नको असलेले प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा जिना परेरा यांनी दिला.

प्रोग्रेसिव्ह फ्रंट कोणाचीही ‘बी’ टीम नाही. म्हादईबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. नदी वाचविण्यासाठीच आम्ही आंदोलनं छेडत आहोत. पण सत्तेवर असलेल्या भाजपला म्हादई कर्नाटकला विकायचीच आहे. त्यामुळं भाजप छुपे अजेंडे राबवत आहे
-हृदयनाथ शिरोडकर, प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे पदाधिकारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!