‘पवार’फुल्ल भेट! कामत शरद पवारांना भेटले, भेटीत ‘चाय पे चर्चा’

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्याचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी सोबत होत्या. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबूकवर शेअर केलाय.
विश्रांतीसाठी गोव्यात आलेल्या शरद पवारांची त्यांनी भेट घेतली असल्याचं कळतंय. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलंय. निवडणुकांना अवघे काही महिने आता बाकी राहिलेले आहेत. त्यामुळे या भेटीनं राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
With Shri. Digambar Kamat, CLP Leader, INC Goa!
Posted by Supriya Sule on Monday, 2 November 2020
पवारांचं कामतांना बॅकिंग
दिगंबर कामत जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळेच त्यांना पाच वर्ष नीटनेटकं सरकार चालवता आलं होतं. अनेक संकटं येऊनही पवारांच्या पाठींब्यानं त्यांचं मुख्यमंत्री पद तरलं होतं. आता पवारांशी घेतलेल्या भेटीत नेमकी कामतांची काय चर्चा झाली, याची उत्सुकता गोंयकरांना लागून राहिली आहे.
कामत राष्ट्रवादीच्या वाटेवर?
दिगंबर कामत हे गोवा काँग्रेससाठी महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी पवारांची सदिच्छा भेट घेतली असल्याचं सांगितलं. पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ केल्याचं त्यांनी सांगितलंय. असं तरी काँग्रेसच्या वर्तुळातही या भेटीनं चर्चांना ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक असल्याचंही म्हटलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याशी ही भेट जोडली जात असून दिगंबर कामत राजकीय पटलावर कुणाला धक्का देतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.
एकूण शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कामत यांच्या भेटीत काय घडलं, यावर चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात भाजपला दे धक्का देणारे शरद पवार गोव्यातही राजकीय खेळीच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. हल्लीच महाराष्ट्रातील भाजपचे नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं भाजपला धक्का बसलाय. अशात आता कामतांच्या भुमिकेकडेही लक्ष लागलेलं आहे.