पर्वरीत पाणी टंचाईमुळे स्थानिक आक्रमक

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : पर्वरीत पाणी टंचाईमुळे संतापलेल्या नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरलं. आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी लोकांसह रस्त्यावर ठाण मांडून पाणी मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या ऑफिसला टाळं ठोकण्यासाठी जाणार्या आंदोलकांना पोलिसांनी आडकाठी केल्यानं लोकांनी रोष व्यक्त केला. आमदार खंवटेंनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यास सात दिवसांची मुदत दिली.
पाणी पुरवठा होत नसल्यानं संतापलेल्या पर्वरीवासीयांनी पाणी पुरवठा विभागाच्या ऑफिससमोर आंदोलन केलं. मात्र अधिकार्यांकडून योग्य उत्तर न मिळाल्यानं लोक संतापले. आमदार रोहन खंवटे यांनी लोकांना साथ देत अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अधिकार्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत अपेक्षित उत्तर न दिल्यानं आमदार रोहन खंवटे यांच्यासह लोक संतप्त झाले. यावेळी पाण्याचे टँकर देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. मात्र अधिकार्यांनी कोरोना एसओपीचे कारण देत असमर्थता दर्शवली.
पाणी मिळेपर्यंत पाणी पुरवठा विभागाच्या ऑफिसला टाळं ठोकण्यासाठी ते सरसावले. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धरले. त्यामुळे झालेल्या झटापटीत काही महिलांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर सात दिवसांत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार खंवटे यांनी दिला.