कदंबाच्या 70 टक्के बस फेऱ्यांमध्ये कपात!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आपल्या बसमध्ये 70 टक्क्यांची कपात केली आहे. प्रवाशांचा प्रतिसादच मिळत नसल्यानं ही कपात करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.
राज्यात शटल बस सेवा पूर्ववत करण्यात आली होती. लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व सेवा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आधीप्रमाणे वेळापत्रकानुसार बस सुरु करण्यात आल्या. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहता केटीसी म्हणजेच कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला बससेवेत कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितंलं जातंय. केटीसीचे जनरल मॅनेजर संजय घाटे यांनी ही माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलंय.
30 टक्केच बस फेऱ्या
कामाच्या वेळा सोडल्या तर बसला प्रतिसाद मिळत नसल्याचं कदंबा प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे कामाच्या वेळेती दोन ते तीन तास सोडल्यास बस या रिकाम्याच असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे या महामारीत आणखी आर्थिक नुकसान होण्यापेक्षा बसच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता फक्त 30 टक्केच बस फेऱ्या कदंबाच्या सुरु आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार येत्या काळात वाढ करण्यात येण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यताय.