फोंड्यामध्ये ‘गोंयचो बाझार’ प्रदर्शनाचं शानदार उद्घाटन

फोंडा व्यापारी आणि व्यावसायिक फोरमतर्फे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : फोंडा व्यापारी आणि व्यावसायिक फोरमतर्फे रविवारी ढवळी-फोंडा येथे ‘गोंयचो बाझार’ या कृषी, घरगुती आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री अशा स्वरूपाच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे माजी अतिरिक्त निवडणूक आयुक्त नारायण नावती, व्यवसायिक देवेंद्र ढवळीकर, अमोल ढवळीकर, फोरमचे अध्यक्ष मनोज गावकर, सचिव ब्रह्मानंद नाईक, खजिनदार संजय फोंडेकर, कार्यकारी सदस्य प्रमोद सावंत, संगम बांदोडकर, अनिल पैंगीणकर, मदनंत वेरेकर आणि रुद्रेश पारोडकर उपस्थित होते.

कार्यक्रमात निरीक्षक मोहन गावडे यांनी फोरमच्या उपक्रमाचं कौतुक केलं. यापुढेही लहान व्यापारी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम आयोजित करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. फोरमचे कार्यकारी सदस्य प्रमोद सावंत यांनी फोंडयातील ग्रामीण भागात कृषी उत्पादने घेणारे शेतकरी, घरगुती पदार्थ तयार करून विकणार्‍या गृहिणी आणि स्वयंसहाय्य गटांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं.

दरम्यान, या उपक्रमासाठी ढवळी-फोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारे मंडळाचे सदस्य तथा उद्योजक देवेंद्र ढवळीकर आणि अमोल ढवळीकर यांचे प्रमोद सावंत यांनी आभार मानले.

माजी अतिरिक्त निवडणूक आयुक्त म्हणतात…

फोंडा व्यापारी आणि व्यावसायिक फोरमचे कार्य आदर्शवत आहे. राज्यातील अन्य समाजसेवी संस्थांनी आपापल्या भागात अशा उपक्रमांचे आयोजन करावे. करोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. या काळात कृषी आणि घरगुती उत्पादने घेणार्‍या लहान व्यावसायिकांना आधार देण्याची गरज आहे.

नारायण नावती, माजी अतिरिक्त निवडणूक आयुक्त
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!