लुईझिन फालेरोंसह तृणमूलमध्ये गेलेले ‘ते’ १० जण कोण? इथे वाचा संपूर्ण यादी!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : सोमवारी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी आपल्या टीएमसी प्रवेशाबाबत कमालीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर त्यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य १० जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

बुधवारी लुईझिन फालेरो हे कोलकातासाठी रवाना झाले होते. त्यावेळीही त्यांना पत्रकारांनी टीएमसी प्रवेश करण्याच्या वृत्ताबाबत विचारणा केली होती. मात्र तेव्हाही त्यांनी आपला निर्णय स्पष्टपणे सांगितला नव्हता. दरम्यान, सोमवारी राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसच्या सोबतच असल्याचं म्हटल्यामुळे फालेरोंनी एकूणच आपल्याबद्दल संभ्रम निर्माण केला होता. अखेर बुधवारी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे इरादे आता स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, फालेरो यांच्यासह एकूण 10 जणांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
फालेरोंसोबत कोणकोण तृणमूलच्या वाटेवर?
१ लवू मामलेदार, माजी आमदार, मगो
२ यतीश नाईक, माजी सचिव, गोवा प्रदेश काँग्रेस
३ विजय वासुदेव पै, माजी सचिव, गोवा प्रदेश काँग्रेस
४ मारीओ पिंटो, माजी सचिव, गोवा प्रदेश काँग्रेस
५ आनंद नाईक, माजी सचिव, गोवा प्रदेश काँग्रेस
६ रबिंद्रनाथ फालेरो, उपाध्यक्ष, युवा काँग्रेस
७ शिवदास सोनू नाईक (एन शिवदास), लेखक आणि कवी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
८ राजेंद्र शिवाजी काकोडकर, पर्यावरवादी आणि अर्थतज्ज्ञ
९ ऍन्टोनियो मॉन्तेरो क्लोविस डिकास्टा, अध्यक्ष. द.गो. वकील संघटना
आता आणखी रंगत!
ज्या दिवशी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा लुईझिन फालेरो यांनी दिला होता, त्याच दिवशी लवू मामलेदार यांनीही आपण लुईझिन यांच्यासोबत असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे लुईझिन फालोरे यांनी सर्व काँग्रेस गटांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचं नमूद केलं होतं. भाजपच्या विरोध महाआघाडी करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

आता फालेरोंच्या तृणमूलमधील प्रवेशानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनीही समविचारी पक्षांसोबत काँग्रेस युतीसाठी सकारात्मक असल्याचं विधान केलं होतं. फालेरोंच्या जाण्यानं अचानक आता काँग्रेसमधील युतीच्या चर्चांना जोर आलाय. तर दुसरीकडे विजय सरदेसाईंनीही आधीत युतीचा चेंडू काँग्रेसच्या हाती दिलाय. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राज्याचं राजकारण आणखीनंच रंगतदार होण्याची शक्यताय.