शिवशक्ती-भीमशक्ती अखेर एकत्र

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.
देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम
मुंबईतील आंबेडकर भवनात ही संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले आहे.
हेही वाचाः दवर्लीतीलच नव्हे, सर्वच बेकायदा घरे पाडा!
आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.
वंचितचा अद्याप मविआत समावेश नाही
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेने आज युती केली असती तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने तर जम्मू-काश्मिरात पीडीपी पक्षासोबत युती केली. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आरएसएस संपवण्याची भाषा केली होती, त्या नितीश कुमारांसोबत भाजपने युती केली. म्हणजे भाजपने बाहेरख्याली केली तरी चालते आणि आम्ही वटपौर्णिमा जरी साजरी केली, तरी यांचा आक्षेप, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
हेही वाचाः चांदर रेल्वे आंदोलनप्रकरणी पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला
शिवसेनेचे हिंदुत्व मान्य : आंबेडकर
शिवसेनेचे प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रबोधनकारांनी समाज व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची मांडणी केली. सर्व समाजाला एकत्र आणणारे त्यांचे हिंदुत्व होते. हे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.