महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही…

मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून चाललेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला. आता नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहे. ‌शिंदे हे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री ठरले आहेत.
हेही वाचा:मणिपूरमध्ये ५५ जवान ढिगाऱ्याखाली; ८ ठार!

कोश्यारी यांनी दिली पद व गोपनियतेची शपथ

मुंबई येथील राजभवनात आयोजित एका छोटेखाणी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेत आहे….’ असे म्हणत त्यांनी ही शपथ घेतली आहे. या सोहळ्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही औपचारिक निमंत्रण देण्यात आले होते. पण, ठाकरे यांनी या सोहळ्याला गैरहजर राहून आपण शिंदे व भाजपला अद्याप माफ केले नसल्याचे संकेत दिले.
हेही वाचा:महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… ‍

सर्वांना दिला अनपेक्षित धक्का

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील, अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी करून सर्वांना अनपेक्षित धक्का दिला.
हेही वाचा:कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ… ‍

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुमत सिद्ध करावे लागणार

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.
हेही वाचा:राजस्थानमध्ये महिनाभरासाठी संचारबंदी, ‘हे’ आहे कारण… ‍

गोव्यातच ठरला शिवसेनेचा गटनेता

शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी रात्री उशिरा गुवाहाटीवरून गोव्यात दाखल झाले होते. तत्पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दोनापावला येथील ताज हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांची बैठक झाली. या बैठकीतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाली होती. गुरुवारी सकाळी ते दाबोळीहून विमानाने मुंबईला गेले.
हेही वाचा:प्रत्येक महिला, कुटुंब आत्मनिर्भर व्हावे ! ‍

शपथविधीपूर्वी नाट्यमय घडामोडी

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशीच चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, गुरुवारी सकाळपासून घडलेल्या नाट्यमय घडामोडींत ते उपमुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे मुख्यमंत्री होतील आणि आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असे घोषित केले होते. मात्र, शपथविधीच्या अर्धा तास आधीपर्यंत हीच स्थिती असतानाच अचानक दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आणि फडणवीस यांनी पुढील अर्ध्या तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
हेही वाचा:गोव्याला कौशल्य विकास संस्थांची गरज… ‍

रिक्षाचालक ते आनंद दिघेंचे मानसपुत्र…
मुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय प्रवास

– एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
– या आधी २०१४ ते २०१९ पर्यंत शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली.
– ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा असे चार वेळा आमदार झाले आहेत.
– रिक्षा चालवणारे शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. त्यांना दिघे यांचे मानसपुत्र म्हटले जाते.
– कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.
हेही वाचा:’हा’ अभिनेता होता बिष्णोई गँगच्या निशाण्यावर… ‍

महाराष्ट्र विधानसभा

एकूण जागा : २८८
एकनाथ शिंदेंकडे संख्याबळ : ४८
बहुमतासाठी आवश्यक जागा : १४५
शिवसेनेचे न फुटलेेले आमदार : १५
भाजपचे संख्याबळ : १०६

शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बंडखोरांचा जल्लोष

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी गुरुवारी गोव्यातून मुंबईत गेलेल्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नेमणूक झाल्याचे वृत्त समजताच दोनापावला येथील ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुक्कामी असलेल्या इतर बंडखोर आमदारांनी जल्लोष साजरा केला. काही आमदारांनी नृत्य करून आनंद साजरा केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर शिंदेंनी तत्काळ गोव्यात असलेल्या आमदारांना फोनवरून याबाबतची माहिती दिली. त्यावेळी सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलले होते.
हेही वाचा:‘फोमेंतो स्कॉलर्स’साठी नावनोंदणी करण्याचे आवाहन… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!