सावधान ! भिडे गुरूजी येताहेत….

डिचोलीत 18 रोजी भव्य महासभेत गरजणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांच्यावर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी बंदी लागू केली होती खरी परंतु आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजीच्या स्वागतासाठी मात्र अखिल गोमंतकीय शिवप्रेमी, राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी हिंदू सज्ज झालेत.

डिचोलीत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी 6 वाजता या महासभेचे आयोजन केलंय. 32 मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापना किल्ले रायगड या विषयावर भिडे गुरूजी व्याख्यान देणाराहेत.

अखिल गोमंतकीय शिवप्रेमी, राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी हिंदूंचे आयोजन

महासभेची जोरदार तयारी

डिचोलीतील या महासभेची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतेय खरे परंतु आयोजकांनी मात्र सर्व कोरोना मार्गदर्शक तत्वांचं पालन करून ही महासभा घेणार असा निर्धार केलाय. संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी हे आपल्या शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे आणि उपक्रमांमुळे बरेच प्रसिद्ध आहेत.

आत्तापर्यंत अनेक वादातही ते अडकलेत आणि त्यांच्यावर अनेक तक्रारीही नोंद झाल्यात. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. भाजपसाठीही त्यांनी काम केलंय परंतु यानंतर त्यांनी स्वतःची शिवप्रतिष्ठान संस्था स्थापन करून स्वतंत्ररित्या आपले कार्य सुरू केलंय.

आंब्यावरून लोकप्रियता

आपल्या अंगणातील आंबा खाल्ल्यास निपुत्रीकांना बाळ होईल, असं विधान केल्यानंतर ते बरेच गाजले. या वक्तव्यावरून त्यांच्यावर तक्रारही नोंद झाली परंतु ते त्यातून सहिसलामत सुटले देखील.

भिडेंची गाजलेली प्रकरणं

संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी यांचं वय 87 वर्षे आहे. ते अनवाणी चालतात. सायकल किंवा एसटीतूनच प्रवास करतात. प्रत्यक्षदर्शी ते एकदम गावरान दिसत असले तरी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. ए केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते, असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं. त्यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेतील प्रत्येकाला धारकरी असं संबोधलं जातं. ते सांगलीत राहतात पण त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडीत असल्याची माहिती प्राप्त झालीए. १८ जून २०१७ रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली. ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे एक हजार अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा- कोरेगाव येथील जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला होता. ह्या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले होते. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोपही केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!