RG | रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब तडीपार होणार?

आरजीला चिरडण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेली चार वर्षे गोंयकारपणाचा जयघोष करत उजो उजो म्हणून संपूर्ण राज्यात चळवळीचा वणवा पेटवलेल्या रिव्होल्यूशनरी गोवन्सचे नेते मनोज परब याला तडीपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उत्तर गोवा पोलिस अधिक्षक यांना तसे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवलंय. आरजी ही संघटना समाजात द्वेष पसरवतेय. ही संघटना कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करतेय आणि या संघटनेचे नेते गुन्हेगारी कारवायांत सहभागी आहेत, असा ठपका पोलिस अधिक्षकांनी आपल्या पत्रात ठेवलाय. २५ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी ठेवलीय.

दोनच दिवसांपूर्वी आरजी संघटनेने आपला राजकीय अजेंडा जाहीर केलाय. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार तसेच ४० मतदारसंघात उमेदवार उतरवणार असं मनोज परब यांनी जाहीर केलंय. या घोषणेमुळे संपूर्ण गोवा ढवळून निघालाय. गोव्यात मुळ गोंयकारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिलायलाच हवे तसेच राज्यात परप्रांतीयांचे बेकायदा धंदे, व्यवसाय बंद व्हायला हवेत आणि गोव्याचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार गोंयकारांना मिळावा ना की परप्रांतीय व्होटबँकेला असा नारा या संघटनेचा आहे. संघटनेकडून पोगो अर्थात पर्सन ऑफ गोवन ओरीजिन नामक एका विधेयकाचा मसुदा तयार करून सगळ्या आमदारांना दिला आहे. या मसुद्यावर विधानसभेत चर्चा करा,अशी त्यांची मागणी आहे. मुळ गोंयकार कोण हे कायद्याने निश्चित करा,अशी त्यांची मागणी आहे. परंतु परप्रांतीय मतदारांच्या भितीने सध्याचा कुणीही आमदार हे विधेयक चर्चेला घेण्यास तयार नाहीत.

शेळ- मेळावलीनंतर आरजी रडारवर

सत्तरी तालुक्यात शेळ- मेळावलीतील आयआयटी विरोधी आंदोलनाच्या माध्यमाने आरजी संघटनेचा दरारा अधीक वाढला. या आंदोलनाच्या निमित्ताने पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून वेगवेगळ्या आरोपांखाली एफआयआर नोंदवण्यात आलेत. ठिकठिकाणी आरजीच्या कार्यकर्त्यांना निर्बंध लागू करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश आदेश विविध न्यायालयांनी फेटाळून लावल्याने सरकारची बरीच नाचक्की झाली आहे. या संघटनेला कोणत्याही परिस्थितीत निवडणूकीपूर्वी आवरणे गरजेचे बनल्यानेच आता मनोज परब यांना दोन वर्षांसाठी उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Melavli 800X450

न्यायव्यवस्थेवर विश्वास

आपल्याला तडीपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरजी संघटनेने आत्तापर्यंत अहिंसामार्गाने आपली चळवळ चालवलीय. कुठेच कायदा हातात घेतला नाही. एवढे करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांप्रमाणे आरजीच्या लोकांना सतावले जातेय. आरजी संघटनेशी जवळीक असल्याचे अनेकजण भासवतात. त्यात काहीजण गुन्हेगारी प्रकरणांत आढळून आल्याचे निमित्त करून या संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मनोज परब म्हणाले. आरजी संघटना आणि आपल्यावर डुख ठेवून हे सरकार वागत आहे. जनता सरकारच्या या सर्व गोष्टींवर नजर ठेवून आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आपल्याला न्याय मिळणार,असेही परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!