‘हळदी डान्स संपला असेल तर पेडणेकडे लक्ष द्या’

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी
पेडणे : राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. लोकांवर आरोग्याचं संकट उदभवलंय. अशावेळी लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे सोडून स्वतः कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून हळद डान्स करणारे पेडणेचे आमदार तथा पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे गायब झालेत. पेडणेकरांना आपल्या नशिबावर सोडून ते मडगावात लपून बसलेत. इथे पेडणेतील आरोग्य यंत्रणा योग्य काम करत आहे की नाही. कासारवर्णे इस्पितळात चाचण्यांसाठी आणि लसीसाठी येणाऱ्या लोकांना परतवून लावले जात आहे. कोरोना किट लोकांना मिळत नाहीएत. पत्रादेवीची सीमा खुलेआम सुरू आहे आणि तिथे किमान कोरोना तपासण्याची यंत्रणा तरी उभारण्यात यायला हवी होती. लोकांच्या सेवकाला पेडणेकरांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांनी राजीनामा देऊन आता आपल्या घरी डान्स करत पुढचा काळ आरामात काढावा,असा टोला मगोचे नेते प्रविण आर्लेकर यांनी हाणलाय.
मगोचे नेते प्रविण आर्लेकर यांनी पत्रादेवी इथे भेट दिली. कोरोना निर्बंधात सीमेवर काहीही निर्बंध नाहीत. सीमा खुल्या आहेत आणि लोकांना बिनधास्त येजा करता येते. ह्याचा धोका सीमेवरील गावांना आहे. किमान चेकनाक्यावर गोव्यात येणाऱ्या लोकांना तपासवण्याची तरी व्यवस्था असायला हवी. खरोखरच लोक कामानिमित्त किंवा अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी येतात की फिरण्यासाठी येतात याची तरी शहानिशी व्हायला हवी,.असेही आर्लेकर म्हणाले.
पेडणेत कोरोनाची प्रकरणी वाढत चाललीत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारोंच्या संख्येने कामगार आहेत. या कामगारांच्या चाचण्या झाल्यात काय. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. हे कामगार सगळीकडे फिरत असतात. हा हॉटस्पॉट झाल्यास त्याचा धोका संपूर्ण परिसराला पोहचू शकतो. चाचणीसाठी कासारवर्णे येथे येणाऱ्या लोकांना चाचणीसाठी किट नाही म्हणून परतून लावले जाते. लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना परत या म्हणून सांगितले जाते. कोरोनाचे किट उपलब्ध नाहीएत. लोकांना इस्पितळात दाखल न करता थेट म्हापशात जा,असे सांगितले जाते. बाबू आजगांवकर यांनी किमान आपल्या समर्थक स्थानिक पंचायत सदस्यांना मदत करून लोकांना योग्य पद्धतीची सेवा मिळेल याची काळजी घेण्याची गरज आहे.