येत्या काही दिवसात राजकारण तापणार! भाजप आणि काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांचा दौरा

आखाडा विधानसभेचा - शनिवारपासून राजकीय घडामोडींना वेग येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चतुर्थीनंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती खरी ठरण्याचे संकेत आहेत. शनिवारपासून भाजप आणि काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक गोव्यात असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार दिवसांचा दौरा

सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक, प्रभारी शनिवारपासून पुढील चार दिवसांत गोव्यात असणार आहे. गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर रोजी गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांच्यासमवेत सहप्रभारी तथा केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि दर्शना जरदोशही उपस्थित असणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् १८ रोजी तिसऱ्यांदा गोव्यात येत आहेत. त्यांच्यासोबत प्रभारी दिनेश रावही तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर आहेत.

काँग्रेसने पी. चिदंबरम् यांच्याकडे वरिष्ठ निरीक्षकपद देऊन गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरवल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे. पक्षाचे सर्वच नेते पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागले आहेत.

प्रदेश काँग्रेसमध्ये या घडामोडी घडत असताना भाजपमध्ये मात्र काहीअंशी शांतता पसरली होती. तोच गोव्याशेजारील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून भाजपला यश मिळवून दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भाजपने गोव्याच्या प्रभारीपदी नेमणूक करून काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न केला. नियुक्तीनंतर फडणवीस २० रोजी प्रथमच गोव्यात येणार आहेत. प्रदेश भाजपच्या कोअर समितीची बैठक घेऊन ते निवडणुकीची पुढील रणनीती आखणार आहेत. निवडणूक जवळ येत असताना भाजपमधील अंतर्गत कलह वाढत चालला आहे. काही मंत्री पक्षावर नाराज असून, पुढील निवडणूक ते इतर पक्षांच्या उमेदवारीवर लढवण्याचा विचार करत आहेत. काही विद्यमान आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांमुळे अनेक भाजप निष्ठावंतांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. पुढील काळात या घडामोडी घडत असताना पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जाण्याची मोठी कसरत फडणवीस यांना प्रभारी म्हणून करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांचा गोव्यातील मुक्कामही वाढेल, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली.

दरम्यान, चिदंबरम् यांनी मागील दौऱ्यावेळीच काँग्रेस नेत्यांना चाळीसही मतदारसंघांत तयारी करण्याचे फर्मान सोडले होते. त्यामुळे काँग्रेसशी तूर्त इतर पक्षांसोबत युती होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. चिदंबरम् आणि प्रभारी दिनेश राव येत्या शनिवारपासून तीन दिवस गोव्यात असणार आहेत. या कालावधीत ते उत्तर गोव्यातील कुंभारजुवे आणि सांताक्रुझ, तर दक्षिण गोव्यातील केपे आणि वास्को येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. याशिवाय निवडणुकीसंदर्भात स्थापन केलेल्या सर्वच समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्षांशीही चर्चा करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे २१ पासून पुन्हा दौरे

प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर लगेचच २१ सप्टेंबरपासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पुन्हा एकदा उर्वरित मतदारसंघांचा दौरा सुरू करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनीच गुरुवारी ही माहिती दिली. निवडणुकीपर्यंत सर्वच मतदारसंघांतील भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी दौऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!