Politics | सिद्धेश फॉर कुंभारजुवा !

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर विधानसभेच्या तयारीला आरंभ

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : उत्तर गोव्याचे गेली 22 वर्षे अखंडीतपणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे, केंद्रात मंत्रीपद भूषविणारे आणि लोकसभा निवडणूकीत 5 वेळा विजयी होऊन अपराजीत ठरलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचं एक वेगळंच स्थान गोव्याच्या राजकारणात आहे. सर्वांचेच भाऊ अशी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. श्रीपाद नाईक यांनी परतून स्थानिक राजकारणात यावं, अशी त्यांच्या असंख्य चाहत्यांची इच्छा अजूनही आहे. परंतु केंद्रात स्थिरावलेल्या भाऊंनी त्याला मोठा प्रतिसाद दिला नाही. श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश नाईक हे मात्र मुख्य राजकीय प्रवाहात जोरदार पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. अलिकडेच जिल्हा पंचायत निवडणूकीत ते निवडून आले. सहजिकच कुंभारजुवेतून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी ते करताहेत. मंगळवारी गुढी पाडव्याचा मुहुर्त साधून ते कुभारजुवे मतदारसंघात ते जिल्हा पंचायत कार्यालयाचे दीमाखदार उदघाटन करणार आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्याला कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे हजर राहणार आहेत. सध्या सिध्देश फॉर कुंभारजुवे या घोषवाक्याने मात्र इथल्या मतदारांचे लक्ष वेधले आहे हे खरे.

पांडुरंग मडकईकरांचा बालेकिल्ला

तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे मतदारसंघावर आमदार पांडुरंग मडकईकर यांची घट्ट पकड आहे. माजीमंत्री आणि गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष निर्मला सावंत यांचा पराभव करून पांडुरंग मडकईकर यांनी मगोच्या तिकीटावर पहिल्यांदा 2002 साली गोवा विधानसभेत प्रवेश केला. मग त्यांनी कधीच मागे वळून पाहीलं नाही. 2005 साली त्यांनी मगोचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. 2005 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली आणि ते पुन्हा विजयी झाले. यानंतर 2007, 2012 च्या निवडणूका त्यांनी काँग्रेस पक्षावरच लढवून ते विजयी ठरले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते भाजपात दाखल झाले.

2017 च्या निवडणूकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. मगो, काँग्रेस, भाजप अशा तिन्ही पक्षांच्या तिकिटांवर निवडून आलेले पांडुरंग मडकईकर यांची लोकप्रियता यातूनच दिसून येते. भाजप सरकारात ते वीजमंत्री होते. दुर्दैवाने जून 2018 मध्ये त्यांना मुंबईत असताना ब्रेन स्ट्रोक आला. तिथेच त्यांना खाजगी इस्पितळात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या ते आजारातून बरे होत असले तरी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

हेही वाचा – Road Issue | पाटो पुलाकडे कुणाचं लक्ष आहे की नाही ?

प्राप्त परिस्थितीत त्यांना आधार घेऊनच सगळी कामे करावी लागत असल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अधांतरी बनलीए. आगामी विधानसभा निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपलीए. या परिस्थितीत मडकईकर यांना उमेदवार मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मडकईकर यांच्या पत्नी जुने गोवे पंचायतीच्या सरपंचा राहील्या आहेत. कदाचित ही उमेदवारी त्यांना मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत ही उमेदवारी सिद्धेश नाईक यांना मिळण्याचीच अधिक शक्यता आहे.

हेही वाचा – सुदिपअण्णा बीए-एलएलबी! ताम्हणकरांचं आव्हान सरकार स्वीकारणार काय ?

उच्चविद्याविभूषित सिध्देशची महत्वाकांक्षा

श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश नाईक हे वडिलांप्रमाणेच मितभाषी, नम्र स्वभावाचे. श्रीपादभाऊंचा स्वभाव हीच त्यांची खरी ताकद आहे आणि त्या बळावरच त्यांनी राजकारणात आपले पाय घट्ट रोवले आहेत. या गुणांचे महत्व सिध्देश यानेही ओळखले आहे. सिध्देश याने एलएलबीचं शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ लॉ इथं केलं. विशेष म्हणजे त्याने मास्टर्स इन गव्हर्नमेंट हा अभ्यासक्रम एमआयटी संस्थेत केलाय. याठिकाणी खास राजकीय नेता बनण्यासाठीचं शिक्षण दिलं जातं. यापूर्वी जुनेगोवे पंचायतीवर पंचसदस्य म्हणून ते निवडून आले. आता खोर्ली जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. मागच्यावेळी 2017 मध्येच ते विधानसभेसाठी इच्छुक होते परंतु पक्षाने पांडुरंग मडकईकर यांना तिकीट दिल्यामुळे ते थोडे नाराज बनले होते. शेवटी पांडुरंग मडकईकर हे विजयी होऊन सरकारात मंत्री बनले. अलिकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणूकीत पांडुरंग मडकईकर यांनी त्यांना पाठींबा दिल्यामुळे सिध्देशचा विजय अधिक सुकर झाला. अलिकडे कुंभारजुवे मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम ते राबवत असतात आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. भाजयुमोचे माजी प्रदेश अध्यक्ष म्हणूनही त्याने काम केलंय. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांचा पाठींबा मिळाल्यास सिद्धेश नाईक यांचा विधानसभा प्रवेश हा नक्की मानला जातोय.

हेही वाचा – BREAKING | CORONA VIRUS | मोदी सरकारचा मोठा निर्णय

सिध्देश फॉर कुंभारजुवा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी हे झेडपी कार्यालयाचे उदघाटन असल्याचे सांगितले. भाजपची उमेदवारी ही सगळी प्रक्रिया पार पाडूनच जाहीर केली जाते असेही ते म्हणाले. दरम्यान, हे कार्यालय झेडपीचे असल्याचे सांगितले जात असले तरी या आमंत्रण पत्रिकेवर सिध्देश फॉर कुंभारजुवा असा लोगो आहे. भविष्यात हेत झेडपी कार्यालय विधानसभा कार्यालयात रूपांतरीत होईल, अशीच चिन्हे सद्धा तरी दिसताहेत.

हेही वाचा – दुर्देवी! गोव्यात सहलीसाठी आलेल्या नौदल अधिकाऱ्यासह मैत्रिणीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

संकटातून सावरतंय नाईक कुटुंब

श्रीपाद नाईक कुटुंबावर एक मोठं संकट अलिकडेच ओढवलं. जानेवारी 2021 मध्ये कर्नाटकात खाजगी भेटीवर गेलेल्या श्रीपाद नाईक यांच्या सरकारी वाहनाला मोठा अपघात झाला. ह्यात त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचे निजी सचिव यांचे निधन झाले. श्रीपाद नाईक हे केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले. हा एक मोठा हादराच या कुटुंबाला बसला. नुकतेच कुठे या भीषण संकटातून हे कुटुंब सावरतंय. अलिकडेच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे कामावर रूजू झालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!