POLITICS | साखळी नगरपालिकेत रंगलय सूडनाट्य

मुख्यमंत्र्यांच्या नगरपालिकेत प्रतिष्ठेची लढाई

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी नगरपालिकेत सध्या मोठं राजकीय नाट्य रंगलय. काँग्रेसचे नेते धर्मेश सगलानी गटाने या नगरपालिकेत मुख्यमंत्र्यांना चांगलंच छळलंय. राज्याचं नेतृत्व करत असतानाही या नगरपालिकेवर मात्र मुख्यमंत्र्यांना आपली सत्ता मिळवता येत नसल्यानं तो त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलाय. बराच खटाटोप करून त्यांनी यशवंत माडकर यांना साखळी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं खरं, पण अखेर काळानंच हा डाव फोल ठरवला. मुख्यमंत्र्यांच्या गटातील दामू घाडी या नगरसेवकाचं अचानक निधन झालं आणि यशवंत माडकर अल्पमतात आले. धर्मेश सगलानी गटाने तत्काळ नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक झाली. परंतु तिथे मुख्यमंत्र्यांचा उमेदवार पराभूत झाला आणि पुन्हा एकदा सगलानी गटाने बाजी मारली. सगलानी गटाने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्याबाबत नगर विकास खात्याकडून हयगय केली जात असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकार आणि नगरविकास खात्याला चांगलेच फैलावर घेतलं. अखेर 16 एप्रिलला दुपारी 2.30 वाजता ही बैठक होणार आहे.

सगलानी गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा संकल्प

कुठल्याही पद्धतीनं सगलानी गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा संकल्पच भाजपने केलाय. या अनुषंगानेच सगलानी गटाचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरोधात नगरविकासमंत्र्यांकडे अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. सगलानी गटाने या याचिकेला मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात आव्हान दिलं. तिथं खंडपीठानं या प्रक्रियेला गुरूवारी स्थगिती दिली. एवढं करून शुक्रवारी अविश्वास ठराव समंत होईल या भीतीने सगलानी गटाचे दुसरे नगरसेवक राया पार्सेकर यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली. त्यांना गुरूवारी संध्याकाळी नोटीस देऊन शुक्रवारी 12.30 वाजता मुरगांव येथे नगरविकासमंत्र्यांसमोर सुनावणीसाठी बोलावण्यात आलंय. 2.30 वाजता अविश्वास ठरावाच्या सुनावणीवेळी राया पार्सेकर यांना बैठकीत सहभागी होण्यापासून परावृत करून हा ठराव बारगळण्यासाठीची ही सगळी खेळण्यात आली होती.

हेही वाचाः POLITICS | साखळी नगरपालिका : नकारात्मक राजकारणामुळे नालस्ती

ही लोकशाहीची हत्या

दरम्यान, सगलानी गटाला याचा वेळीच सुगावा लागल्याने त्यांनी या प्रक्रियेला मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलं होतं. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी खंडपीठाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आणि भाजपला मोठा हादरा बसला. भाजपचे सगळेच डाव फोल ठरल्याने पक्षाची आणि किंबहुना मुख्यमंत्र्यांचीही बरीच नालस्ती झालीए. आता राया पार्सेकर यांच्याविरोधात डिचोली पोलिस स्थानकात बनावट उत्पन्नाचा दाखला देऊन सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचा ठपका ठेवणारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून राया पार्सेकर यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येतेय. दुपारी 2.30 वाजेपर्यंत काहीही करून विरोधी गटाला अविश्वास ठराव समंत करण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावलीए. हा प्रकार राज्यभराच चर्चेचा विषय ठरलाए. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उडवलीय. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप कामत यांनी केलाय. आता दुपारी 2.30 वाजता नेमकं काय होतंय आणि राजकीय सूडनाट्याचा शेवट काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलंय.

हेही वाचाः Politics | AAP | मनीष सिसोदियांच्या गोवा दौऱ्याचा अन्वयार्थ #Goa #Marathi #News

राया पार्सेकरांना अटकपूर्व जामीन

गोवा खंडपीठाने सकाळी दणका दिल्यानंतर आता राया पार्सेकर यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने भाजपला दुसरा दणका मिळालाय. भाजपकडून राया पार्सेकर यांना अविश्वास ठराव बैठकीत सहभागी होण्यापासून परावृत्त करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरलेत. आता नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर होण्याचा मार्ग तुर्त तरी मोकळा झालाय. तरीही दुपारी 2.30 वाजेपर्यंत सरकार आणि भाजप आणखी काय खेळी करताहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे

हा व्हिडिओ पहाः POLITICS I साखळी नगरपालिका : नकारात्मक राजकारणामुळे नालस्ती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!