मुरगावच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी दामोदर कासकर आणि श्रद्धा महाले बिनविरोध

आता प्रतीक्षा फक्त उद्या होणाऱ्या अधिकृत घोषणेची

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : नगराध्यक्ष पदासाठी दामोदर कासकर व उपनगराध्यक्ष पदासाठी श्रध्दा महाले शेट्ये यांच्याव्यतिरिक्त कोणीच अर्ज दाखल न केल्याने मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. यासंबंधी गुरुवारी होणाऱ्या पालिका मंडळाच्या खास बैठकीत घोषणा करण्यात येईल.

समीकरण काय आहे?

मुरगाव पालिकेच्या निवडणुकीत २५ पैकी १९ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार जिंकले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे चार अपक्ष उमेदवारांचा भाजपा गटाला पाठिंबा आहे. काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्या पॅनेलामधून निवडून आलेले श्रध्दा आमोणकर आणि योगिता पार्सेकर या नगरसेविका विरोधी गटाच्या आहेत. त्यामुळे भाजपा पुरस्कृत गटाकडे बहुमत असल्याने भाजपाचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होणार यात शंकाच नव्हती. फक्त यंदा मंत्री आणि आमदार यांच्या गटांचे राजकारण पुन्हा दिसणार काय?, याकडे वास्कोवासियांचे लक्ष होते.

हेही वाचा : सरकार ‘फास्ट’ मोडवर; बळींनंतर आता तौक्ते पीडितांनाही तात्काळ मदत

कशी झाली नावं निश्चित?

भाजपा समर्थक नगरसेवकांमध्ये दुही माजू नये, यासाठी बहुमत असूनही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवार रात्री साडेनऊ वाजता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी नावे घोषित केली नव्हती. पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अड. नरेंद्र सावईकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस सतीश धोंड, मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार कार्लुस आल्मेदा आणि मुरगावचे भाजपा मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर यांची बैठक झाली. त्या बैठकीत चर्चेअंती दामोदर कासकर आणि श्रध्दा महाले शेट्ये यांची अनुक्रमे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यासंबंधीचा निर्णय तेथे उपस्थित असलेल्या नगरसेवकांना सांगण्यात आला.

कासकर यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवकांना करण्यात आलेय. दामोदर कासकर हे पहिले वर्षभर नगराध्यक्ष पदावर राहतील. त्यानंतर दुसरया नगरसेवकाला संधी देण्यात येईल, असंही कळतंय. दामोदर कासकर हे प्रभाग क्रमांक चार मधून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ते नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटाचे आहेत तर श्रध्दा महाले शेट्ये या प्रभाग क्रमांक २१ मधून निवडून आल्या आहेत. त्या आमदार कार्लुस आल्मेदा आणि मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या समर्थक आहेत.

हेही वाचा : WhatsAppची हायकोर्टात धाव, प्रायव्हसीच्या अधिकाराचं उल्लंघन होण्यावरुन केंद्रावर निशाणा

अखेर बिनविरोध!

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी सकाळी दामोदर कासकर, श्रध्दा महाले शेट्ये यांच्यासह खासदार विनय तेंडुलकर, दीपक नाईक, प्रजल मयेकर, मंजुषा पिळणकर, कुणाली मांद्रेकर, देविता आरोलकर, रामचंद्र कामत, अमेय चोपडेकर, दयानंद नाईक, दामोदर नाईक हे उपस्थित होते. पालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज स्विकारले. मुरगाव पालिका मंडळामध्ये विरोधकांची संख्या नगण्य असल्याने इतर कोणीच अर्ज दाखल केले नाही.

हेही वाचा : Crime | मास्कवरुन राडा! सुपरमार्केटमधील CCTV समोर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!