‘विश्वजीत राणे माझे चांगले मित्र, पण जे चूक ते चूकच!’

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका माहीत असतानाही आरोग्य खाते बेफिकीर राहिले. त्यामुळेच गोवा आज बाधित आणि मृत्यूदरात आघाडीवर आहे. आरोग्य खात्याचे हे अपयश आरोग्यमंत्र्यांनी स्वीकारावे आणि जबाबदारी स्वत:वर घ्यावी, असे म्हणत आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी मंगळवारी पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
राज्यातील कोरोनास्थिती गंभीर होऊन दिवसाला २०० जणांचा मृत्यू होण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्याआधी कोरोनाची दुसरी लाट इतर देशांमध्ये थैमान घालत असल्याचेही दिसून आले होते. तरीही आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा का सक्षम केली नाही, कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या सुविधा तत्काळ का उभारल्या नाहीत, इस्पितळांत डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असतानाही त्यांची भरती का केली जात नाही, डॉक्टरांना स्वातंत्र्य का दिले जात नाही, असे विविध सवाल उपस्थित करत त्यांनी आरोग्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.
माजी आरोग्य सचिव नीला मोहनन आणि जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी सरकारी हस्तक्षेप होऊ न देता पहिल्या लाटेवर ज्याप्रकारे यशस्वी मात केली, तशी कामगिरी सध्या अधिकाऱ्यांकडून होत नाही. आरोग्य खात्यातील या प्रकाराची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहे, असेही आमदार मॉन्सेरात यांनी नमूद केले.
बाबुश मॉन्सेरात यांची महत्त्वाची वक्तव्य
‘अपयशाची जबाबदारी स्वीकारा!’
लस नसताना पहिल्या लाटेत गोवा उत्तम लढला
‘दुसरी लाट येईल’ माहीत असूनही गाफील राहिलो
कुणीतरी जबाबदारी घेण्याची गरज- बाबुश मॉन्सेरात
लोकांचा जीव जातोय, याची नैतिक जबाबदारी स्वीकारा
तुम्ही चुकला आहात, तर चूक मान्य करा- बाबुश
‘विश्वजीत राणे माझे चांगले मित्र, पण जे चूक ते चूकच!’
‘आरोग्य खात्याचं नेतृत्त्व असलेल्यांनी अपयश झाकू नये’
मी स्वतः हतबल झालो आहे- बाबुश मॉन्सेरात
‘लोकं बेड्ससाठी फोन करतात, पण कुठून देणार?’
50 टक्के मंत्री हे बिनकामाचे आहेत
तुम्ही काहीही केलं नाही, म्हणून ही स्थिती उद्भवली
राज्याचा मृत्यूदर सर्वाधिक असणं हे दुर्दैवी
मंगळवारी सकाळी राणेंचा पलटवार, रात्री बाबुश यांचा हल्लाबोल
ज्यातील कोरोना प्रसारावरून आरोग्य खात्यावर आरोपांची सरबत्ती केलेल्या पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांना आरोपांऐवजी सूचना करा. संघटित होऊन करोनावर मात करा, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी दिला होता.
सरकारातील सर्व मंत्री, अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी कोरोना प्रसार रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी आपल्यासोबत येऊन सरकारी इस्पितळांत डॉक्टर कशा परिस्थितीत काम करत आहेत, ते पहावे. राज्यात कोरोना प्रसार वेगाने वाढत असल्याने परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. त्यावर आम्ही संघटित राहून मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत कोणीही आरोपबाजी किंवा टीका करून करोनाविरुद्ध लढणाऱ्यांमधील आत्मविश्वास कमी करू नये, असे आवाहन त्यांनी केलं होतं.
आपण आताच आरोग्यमंत्री झालेलो नाही. याआधीही आपण या खात्याचा कारभार सांभाळला असून, आरोग्यविषयक विविध सुविधा उभारल्या आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी परिस्थिती इतकी गंभीर नव्हती. त्यामुळे आम्ही संघटितपणे त्यावर मात केली होती. पण आता स्थिती तशी नाही. दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे साधनसुविधा अपुऱ्या पडत आहेत. तरीही सरकार विविध मार्गांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसी तसेच इतर आवश्यक सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. करोनाची दुसरी लाट पुढे काय करणार, राज्यातील परिस्थिती काय असणार हे कोणालाही माहीत नाही. सर्वांनी एकत्र येऊन करोना रोखणे हेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केलं होतं. दरम्यान मंगळवारी सकाळी राणेंनी पलटवार केल्यानंतर बाबुश यांनी पुन्हा माध्यमांशी बोलताना विश्वजीत राणेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.