म्हादईच्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री राणेंचं सावंतांना प्रत्युत्तर

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: म्हादई पाणी वाटप लवाद स्थापन करण्यासाठी मुख्य याचिकेतून चौथी आणी पाचवी तरतूद काढणे बंधनकार होते, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी दिले आहे. त्याबाबतची विनंती पत्रे केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने गोवा सरकारला केली होती. त्या दोन तरतूदी काढल्यानंतरच लवादाची स्थापना झाली असे राणेंनी सांगितलय. यात त्यावेळच्या ॲडवोकेट जनरल यांचाही सल्ला घेण्यात आला होता अशी माहिती राणेंनी दिली.
मुख्यमंत्री सावंतांनी केले होते आरोप
तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्र्यानी मुख्य याचिकेतून 4थी आणि 5वी तरतूद काढल्याने कर्नाटकचे फावले, असा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलाय. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. 2006 ते 2012 या काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटक विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर प्रतापसिंह राणे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रतापसिंह राणे यांनी आपली बाजू मांडली. गोव्याने आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे असा सल्लाही राणेंनी दिलाय. कोणत्याही परिस्थितीत म्हादईच्या पात्राचे पाणी मलप्रभेत सोडू शकत नसल्याचेही राणे यांनी सांगितले.