मगोच्या अपात्रता याचिकेवर आज निवाडा, सभापती काय निर्णय घेणार?

दुपारी ४ वाजता काय होतं याची प्रतीक्षा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मगोच्या दोन फुटीर आमदारांविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सभापती राजेश पाटणेकर बुधवारी सायंकाळी निवाडा देणार आहेत. विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी त्यासंदर्भातील पत्र याचिकादार तथा आमदार सुदिन ढवळीकर यांना मंगळवारी पाठवले आहे.

आमदार अपात्रता याचिकेसंदर्भात बुधवारी सायंकाळी ४ वाजता सभापतींच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मगोच्या अपात्रता याचिकेवर बुधवारीच सुनावणी शक्य आहे. दरम्यान, काँग्रेसच्या दहा आणि मगोच्या दोन अशा बारा फुटीर आमदारांविरोधात दाखल झालेल्या अपात्रता याचिकांवरील सुनावण्या २६ फेब्रुवारी रोजी पूर्ण करून सभापती पाटणेकर यांनी त्यावरील निवाडा राखून ठेवला होता.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार होती. त्यामुळे सभापती त्याआधीच निकाल देण्याची शक्यता होती. पण, मार्चच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सुनावणीसाठी आली नाही. त्यामुळे याचिकांवर १२ मार्च रोजी सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यानंतर सभापतींनी बुधवारी मगोचे याचिकादार सुदिन ढवळीकर यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे सभापती बुधवारी प्रथम मगोच्या याचिकेवरील निवाडा देऊ शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!