विश्वजीत राणेंच्या आयआयटीविरोधी पाठिंब्यानं नवा ट्वीस्ट, ग्रामस्थ म्हणतात…

"विश्वजीत राणेंचा तो व्हिडीओ हास्यास्पद"

देविदास गावकर | प्रतिनिधी

सत्तरी : गेल्या दोन दिवसांपासून शेळ-मेळावलीतील आंदोलनाला पाठिंबा वाढतोय. दरम्यान दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनीही मंगळवारी एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओतून त्यांनी शेळ मेळावलीतील लोकांना पाठिंबा दिला. या घडामोडीनं एकूणच राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. या पार्श्वभूमीवर शेळ मेळावलीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विश्वजीत राणेंनी जारी केलेल व्हिडीओ हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. मेळावलीतील ग्राम बचाओ आंदोलनाचे शुभम शिवोलकर यांनी पत्रकार परिषदेत विश्वजीत राणेंनी घेतलेल्या भुमिकेवरुन सवाल उपस्थित केलेत.

आताच कशी जाग आली?

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि स्थानिक आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांना वाळपईत आयआयटी स्क्रॅप करावी म्हणून लिहिलेलं पत्र आणि काढलेला व्हिडिओ हा हास्यास्पद असल्याची टीका ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. वाळपईवासी माझे बांधव आहेत आणि त्यांना झालेला त्रास मला दुःख देतो असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे
मागचे 9 महिने मेळावलीवासी जो अत्याचार सहन करतायत, त्यावेळी विश्वजीत राणे कुठे होते? तेव्हा त्यांना आमचं दुःख का दिसलं नाही का? असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.

‘बिल्ली हज को चली’

विश्वजीत राणेंनी फेसबुकवर लाईव्ह येऊन मेळावलीत आयआयटी नको असं म्हणणं म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,’ असा प्रकार असल्याची घणाघाती टीका ग्रामस्थांनी केली आहे. ऑगस्ट २०१९मध्ये मेळावलीत आयआयटी प्रकल्प व्हावा म्हणून खुद्द विश्वजीत राणेंनीच विनंती केली होती. मेळावलीत भागात आयआयटी विकास घडवून आणेल असंही त्यांनी म्हटलेलं. 9 लाखाच्या जागी 13 लाख देण्याची विनंती सुद्धा विश्वजीत राणेंनी केली होती. आमच्या पोटावर पाय देणारेच आता आमचं सांत्वन करत असल्याचं मेळावातील घेण्यात आलेल्या ग्रामस्थांनी म्हटलंय.

आमची निव्वळ फसवणूक

मेळावलीवासीयांची निव्वळ फसवणूक सुरु असल्याची टीकाही ग्रामस्थांनी केली आहे. आमची सगळीच जागा आयआयटी प्रकल्पासाठी घ्यावी, असं विश्वजीत राणेंनी पत्रात म्हटलेलं. कॅबिनेटला नोट पाठवला होता, ज्यात हाच प्रकार सांगितला होता.
या सगळ्या वागण्यावरुन विश्वजीत राणे आमच्या भावनांशी खेळत आहेत की काय, अशी शंका मेळावलीवासीयांनी उपस्थित केली आहे.

ग्रामस्थांचे महत्त्वाचे मुद्दे –

आम्ही सरकारला इशारा देतो, की आमच्या जमिनींचा विषय सुटत नाही, आमच्या ट्रान्सफर ऑर्डर काढून जो आम्हाला त्रास दिलाय, आमच्या एसटी बांधवाविरुद्ध जी खोटी तक्रार केलीये, त्याबद्दल आम्ही शांत बसणार नाही.

विश्वजीत राणे आमच्या ताकदीचा गैरवापर करत आहेत, जे आम्ही कधीही सहन करणार नाही.

विश्वजीत राणेंनीच आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी नोंदविल्या आहेत

आम्ही इथे वावरलो. गोवा स्वातंत्र्यात योगदान दिलं. पण अजूनही आमच्या जागा आमच्या नावावर का नाहीत? आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत आणि मग आम्हाला भाऊ-बहीण म्हणावं!

जर तुम्ही म्हणता की हे सर्व पुरावे खोटे आहेत तर ते सिद्ध करावं.

सत्तरीची बहीण लता गावकर या दिव्यांग महिलेची दूर केलेली बदली हा एक प्रकारचा अन्यायच होतात्याविषयीही तुम्ही काही केलं नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर द्या.

-विश्वजीत राणे तुम्ही असं नाटक का करताय?

मात्र आयआयटीविरोधात जे कुणी आम्हाला पाठिंबा देत आहेत त्या सर्वांचे आम्ही आभारीच आहोत.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!