म्हापशेकरांचो एकवट अल्पकाळाचा! शुभांगी वायंगणकरचा भाजप प्रवेश

नगराध्यक्षपद शुभांगी यांच्या वाट्याला?

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : उत्तर गोव्यातील सर्वांत महत्वाच्या म्हापसा नगरपालिका निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्रितरित्या भाजपला जोरदार आव्हान देत सत्तेपासून रोखले खरे परंतु म्हापशेकारांचो एकवट असे नाव दिलेल्या या गटाचा एकवट अल्प काळ टीकला. या गटाच्या नगरसेवक शुभांगी वायंगणकर यांनी भाजपात प्रवेश करून नगरपालिकेवरील या गटाच्या सत्तास्थापनेचे स्वप्न अखेर उधळून लावले. विशेष म्हणजे म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. शुभांगी वायंगणकर यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तविली जाते.

माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली म्हापशेकारांचो एकवट हा गट निवडणूकीत उतरला होता. सर्व विरोधकांनी एकत्रितरित्या भाजपला जोरदार आव्हान देत नगरपालिकेत सत्तेपासून रोखण्यात यश मिळवले होते. भाजप पुरस्कृत गटाला 9 आणि म्हापशेकारांचो एकवट गटाला 9 अशी समसमान जागा मिळाल्या होत्या. प्रकाश भिवशेट आणि आनंद भाईडकर हे दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यांचा पाठींबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून जबरदस्त स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत अखेर शुभांगी वायंगणकर यांनी भाजपात दाखल होऊन भाजप विरोधकांच्या रणनितीवर पाणी फेरले आहे. माजी नगरसेवक गुरूदास वायंगणकर यांच्या त्या पत्नी होत तसेच शुभांगी वायंगणकर या माजी नगरसेवक म्हणून राहील्याने त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्या गळ्यातच नगराध्यक्षपदाची माळ पडण्याची अधिक शक्यता आहे.

म्हापसा ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढत ठरली होती. म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यासाठी ही लढत खूप मोठी होती. प्राप्त माहितीनुसार कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांचा विरोधी गटाला पाठींबा होता,अशी जोरदार चर्चा म्हापशात सुरू आहे. जोशुआ डिसोझा यांनीही मायकल लोबो यांच्या भूमीकेबाबत नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, अपक्ष नगरसेवक प्रकाश भिवशेट हे सध्या कोरोनाबाधीत झाले आहेत. आनंद भाईडकर यांचा पाठींबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कदाचित भाजपला पाठींबा दिल्यास या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडू शकते,अशीही शक्यता आहे. सध्या प्रकाश भीवशेट आणि विराज फडके हे दोघे कोरोना पॉझिटीव्ह असल्याची खबर आहे.

भाजप पुरस्कृत पॅनलवर चंद्रशेखर बेनकर (प्रभाग 2), बार्बरा कारास्को (प्रभाग 3), सुशांत हरमलकर (प्रभाग 4), केयल ब्रागांझा (प्रभाग 9), प्रिया मिशाळ (प्रभाग 10), किशोरी कोरगांवकर (प्रभाग 11), आर्शिवाद खोर्जुवेकर (प्रभाग (12), साईनाथ राऊळ (प्रभाग 14), स्वप्नील शिरोडकर (प्रभाग 15) हे विजयी ठरलेत. म्हापशेकारांचो एकवट पॅनलचे अ‍ॅड. शशांक नार्वेकर (प्रभाग 5), डॉ. नूतन बिचोलकर (प्रभाग 6), अ‍ॅड.तारक आरोलकर (प्रभाग 7), विकास आरोलकर (प्रभाग 8), कमल डिसोझा (प्रभाग 13), विराज फडके (प्रभाग 16), शुभांगी वायंगणकर (प्रभाग 17), अन्वी कोरगांवकर (प्रभाग 18) व सुधीर कांदोळकर (प्रभाग 19) हे विजयी झालेत तर आनंद भाईडकर (प्रभाग 1) आणि प्रकाश भिवशेट (प्रभाग 20) हे दोघेजण अपक्ष उमेदवारीवर म्हणून विजयी झालेत.
दरम्यान, म्हापसा, मडगाव आणि मुरगांव पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवडणुक पुढे ढकलण्यात आलीए. तिन्ही पालिकांचे एकूण सात नगरसेवक कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. केपे आणि सांगे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदांसाठी 10 मे रोजी निवडणुक होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!