ठरलं एकदाच! आरजी निवडणुकीत उतरणारच, घोषणा झाली

मनोज परब यांची खास पत्रकार परिषदेच घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोंयकारांच्या हक्कांसाठी राज्यभरात सुरू झालेली रिव्होल्यूशनरी गोवन्स म्हणजेच आरजी संघटना आता राजकारणात उतरणार आहे. यापूर्वी घोषणा झाली होती खरी परंतु सोमवारी संघटनेचे निमंत्रक मनोज परब यांनी खास पत्रकार परिषद आयोजित करून राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. राज्यातल्या सर्व ४० मतदारसंघात आरजी उमेदवार उतरवणार आहे. गोव्याचे आणि गोंयकारांचे अस्तित्व टीकवून ठेवायचे असेल तर प्रत्येक गोंयकाराने या चळवळीत सक्रीयपणे सहभागी व्हावे लागेल आणि सर्व गोंयकारांनी मिळूनच राजकीय प्रवेशातून सत्ता प्राप्तीचा हा संकल्प खरा करून दाखवावा लागेल,असे आवाहन मनोज परब यांनी केलंय.

आता निवडणुकीची रंगत वाढेल

रिव्होल्यूशनरी गोवन्स या संघटनेने सध्या गोव्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडवलीय. सोशल मिडीया काबीज करून ठेवलंय. फेसबुक लाईव्हचा एक वेगळाच दबदबा या संघटनेने तयार केलाय. नुसतं फेसबुक लाईव्ह सुरू झालं की लाईक्स आणि शेअरचा जणू पाऊस सुरू होतो. अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हा प्रतिसाद पाहून घाबरतात. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात रस्त्यावरही आत्तापर्यंत अनेक आंदोलने करून या संघटनेने गोव्याच्या घराघरात आपली ओळख तयार केलीय. आता जेव्हा ही संघटना सर्वंच प्रचलित राजकीय पक्षांसाठी धोक्याची ठरू शकते, हे ओळखल्यानंतर आता पोलिस आणि अन्य सरकारी यंत्रणांचा वापर करून या संघटनेच्या कारवायांवर बारीक नजर ठेवली जातेय. शेळ-मेळावलीतील आयआयटी विरोधी आंदोलनात या संघटनेचा सक्रिय वाटा होता. या आंदोलनाची तीव्रता लक्षात आल्यानंतर राज्यातील भाजप सरकारने या संघटनेच्या प्रमुख नेत्यांना जणू रडारवर ठेवलंयय. संघटनेला बैठका घेण्यासही परवानगी दिली जात नाही. गेले दोन महिने राजकीय पक्षाची घोषणा जाहीररित्या करण्यासाठी ही संघटना परावनगी मागीत आहे पण त्यांना वेगवेगळ्या कारणांत्सव परवानगी नाकारण्यात येतेय. उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत कायदा आणि सुव्यवस्थेचे निमित्त पुढे करून या नेत्यांना समन्स जारी करण्यात येताहेत. आता वेगवेगळ्या न्यायालयांकडून हे समन्स फेटाळण्यात येत असल्याने सरकारचीच नाचक्की होऊ लागलीय. आता सरकार अगदीच अडचण करीत असल्याने सोमवारी अखेर एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजकीय पक्षाची घोषणा करण्याचा निर्णय या संघटेनेने घेतला आणि अखेर आरजी संघटनेने आपला राजकीय प्रवेशाचा इरादा स्पष्ट केला. आरजीच्या राजकीय प्रवेशामुळे गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार तर बनेलच पण त्याचबरोबर अटीतटीची ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

इंजिन थंडावलं आता उजोचं काय ?

मुंबईतला मराठी माणूस अशी टॅग लाईन पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तिथेही मराठी माणसावर परप्रांतीयांकडून होणारा अन्याय, मराठी माणसाना डावलण्यात येणारे अधिकार, सरकार करीत असलेले परप्रांतीयांचे लाड हे विषय हातात घेतले होते. सोशल मिडीयाने तर या चळवळीला जणू डोक्यावरच घेतले होते. राज ठाकरे यांच्या सभा एतिहासिक ठरू लागल्या होत्या. मात्र ही लोकप्रियता मतपेटीत परिवर्तित होऊ शकली नाही. मनसेचं इंजित काही पुढे सरकू शकलं नाही. गोव्यात आरजीची टॅगलाईन उजो म्हणजे आग आहे. प्रत्येक नीज, मुळ गोंयकारांच्या काळजाच पेटलेली अन्यायाची आग असा त्याचा अर्थ मानला जातो. ही आग प्रस्थापीत राजकीय पक्षांना कशी काय भस्म करू शकेल की त्यांच्या आश्वासने, आमिषे आणि इतर गोष्टींमुळे शमेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी या संघटनेची टर उडवलीय. सरकारातील एका मंत्र्यानं तर चक्क सर्व ४० सही मतदारसंघात डिपोझीट जप्त होईल,असं म्हटलंय.

व्हीजन डॉक्यूमेंटचे काम सुरू

गोव्यासाठी एक वेगळाच व्हीजन डॉक्यूमेंट तयार केला जाईल,अस परब यांनी म्हटलंय. हा डॉक्यूमेंट गोंयकार तयार करणार. कुणा बाहेरील एजन्सीला तयार करायला लावणार नाही. यासाठी त्यांनी प्रत्येक गोंयकाराने आपलं मत, सुचना आणि कल्पना मांडाव्यात असं आवाहन केलंय. आरजीच्या या चळवळीत सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी आणि सदस्य नोंदणीसाठी त्यांनी 8801000011 या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन केलंय. प्रत्येकाच्या सक्रीयतेतूनच सत्तेपर्यंत पोहचता येईल,असंही परब यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!