खरंच #Lockdown हा एकमेव पर्याय उरलाय का? ‘या’ आहेत ४ शक्यता

आरोग्यमंत्र्यांचं ट्वीट आणि लॉकडाऊनच्या अफवा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : लॉकडाऊन करण्याची गरज डॉक्टर प्रमोद सावंत सरकारमधील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी काही ट्वीटही केले. हे ट्वीट फक्त लॉकडाऊनच्या मागणीचे होते असं नाही. तर या ट्वीटमधून धक्कादायक अशी आकडेवारी देत विश्वजीत राणेंनी काही भीतीदायक असे अंदाज वर्तवले आहेत. फक्त विश्वजीत राणेंनीच लॉकडाऊनची मागणी केली आहे, असं नाही. मगो आमदार सुदिन ढवळीकरांनीही लॉकडाऊनची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात आता खरंच लॉकडाऊन हा एकमेव पर्याय उरलाय का? याच्या शक्यता पडताळणं गरजेचं आहे.

शक्यता क्रं. १ आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात विसंवाद?

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कोरोनाबाबत राज्यात धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत. ट्वीट करत त्यांनी राज्यातील कोविड परिस्थिती किती भयंकर आणि विघातक होत चालली आहे, याचं भाकित वर्तवलं आहे. येत्या काळात २०० ते ३०० लोकांचा मृत्यू २४ तासांत नोंदवला जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला २ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहे. तर सोमवारी ३८ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झालाय. एप्रिल महिन्याचा शेवट होण्याच्या आधीच.. पहिल्या २६ दिवसांत तब्बल २००हून अधिक रुग्णा गोव्यात दगावले आहेत. हा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. एप्रिल महिन्यात देशासह गोवा राज्यात झालेली रुग्णवाढ, पॉझिटिव्हिटी रेट आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण या सगळ्याचा आढावा घेतला तर आरोग्य मंत्र्यांनी केलेली मागणी रास्त वाटते. मात्र त्यावर अखेरचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं म्हणत त्यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टाकलाय.

सातत्यानं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जर एकमेकांसोबत संपर्कात असतील, तर मग आरोग्य मंत्र्यांचं हे ट्वीट या संपर्कावरच सवाल उपस्थित करणारं आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाची मागणी करणं, आणि त्यानंतर उच्चस्तरीय बैठक घेऊन लॉकडाऊनचा विचारही नाहीये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगण, हे अनेक गोष्टी अधोरेखित करतं. त्यातली प्रमुख गोष्ट जी अधोरेखित होते, ती मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांमधील संवादच!

जीएमसीत पाहणी करायला मुख्यमंत्री दोनदा गेले. तिथे जीएमसीचे डीन आणि इतर अधिकारी, कर्मचारी दिसले. पण आरोग्यमंत्री यावेळी दिसले नाही. असं का? हा प्रश्नही अनेक चर्चांना वाचा फोडतोय. याचे अर्थ काहीही निघाले, तरी सध्याच्या घडीला समन्वयाचा अभाव सरकारमधील मंत्र्यांमध्ये आहे की काय? अशी कूजबूज ऐकायला मिळतेय. त्यामुळे येत्या काळात खरंच जर आरोग्यमंत्र्यांनी वर्तवलेल्या भीतीप्रमाणे दिवसाला २०० ते ३०० रुग्ण दगावले तर ते सांगायला मोकळे आहेत की.. मी तर लॉकडाऊनची मागणी केली होती, पण मुख्यमंत्र्यांनी नाकारली. आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीही सांगायला मोकळे आहेत, की ऐनवेळी रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्यामुळे मृत्यू वाढलेत. यात मधल्या मध्ये सर्वसामान्य गोमंतकीय जनता भरडली जाणार आहे, हे कुणीच विसरता कामा नये.

शक्यता क्रं. २ लॉकडाऊनने प्रश्न सुटेल? मिटेल?

आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे जरी गोव्यात लॉकडाऊन केला, तरी कोरोना संसर्गाचा प्रश्न सुटेल का? आणि सुटलाच तरी तो कायमचा मिटेल का? याकडे कुणाचंच लक्ष नाही. कारण गोव्याशेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांनी लॉकडाऊन केलाय. पंजाबनेही लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. अशावेळी आता लॉकडाऊन केला आणि त्या वेळेत जर कायमस्वरुपी कामाला येईल, अशी आरोग्य यंत्रणा सरकारला उभी करता आली नाही, तर मात्र कठीणए. कारण जे पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालं, त्याच चुका पुन्हा होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे.

रुग्णवाढ झाल्यानंतर कोविड सेंटर, बेड्स, ऑक्सिजन, रेमडिसिविर या सगळ्याची चर्चा होतेय. मुळात ही यंत्रणा मुबलक प्रमाणात वाढत्या रुग्णसंख्येसाठी उपलब्ध करण्याचं काम व्हायला हवं होतं. पण तसं झालं का? माहीत नाही. कदाचित झालं असेलही. पण ते पुरेस नव्हतं, हे तर आताची परिस्थिती अधोरेखित करतेय. त्यामुळे लॉकडाऊनमुळे प्रश्न सुटणारही नाही आणि मिटणारही नाही. त्यासाठी कायमस्वरुपी आरोग्य यंत्रणा इतकी सक्षम करावी लागले, की याच नाही तर भविष्यातील कोणत्याही महमारीला तोंड देण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य सुविधा कुठेच कमी पडणार नाहीत.

शक्यता क्रं ३ केंद्राचा मुख्यमंत्र्यांवर दबाव?

सुरुवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी राज्यांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. त्यामुळे केंद्राला नको म्हणून गोवा सरकारही राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेईल, असी शक्यता कमीच दिसते आहे. मात्र सगळं पर्यटन सुरु ठेवून, राज्याचं अर्थचक्र चालवण्यासाठी आपण धाडसी निर्णय घेत असल्याचं जर सरकार भासवत असले, तर त्यावरही सवाल उपस्थित होतात. कारण गोव्याशेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे पर्यटक येणार तर फक्त विमानाने येणार, असं जरी गृहित धरलं तरी त्यांची संख्या ही फार मोठी असण्याची शक्यता कमीच आहे. असं असताना पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात लॉकडाऊनचा निर्णय न घेता गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे ३० एप्रिलला मुख्यमंत्री कडक निर्बंध, संचारबंदीसारखे निर्णय घेण्याची जास्त शक्यता आहे. सोबत आता जे नियम लागू करण्यात आले आहेत, त्यातही वाढ होण्याचीच शक्यता जास्त आहे.

शक्यता क्रं ४ बेड्स तयार होतील! डॉक्टरांचं काय?

देशात रुग्णांचे जे हाल होत आहेत, ते सर्वाधिक जीडिपी असणाऱ्या गोवा राज्यातही झाले, तर ती लज्जास्पद गोष्ट ठरणार आहे. दरम्यान, राज्यात सरकारी रुग्णालयं आताच कोरोना रुग्णांनी ओव्हरफ्लो झाली असल्याचं जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकरांनी सांगितलं होतं. याचा परिणाम हळूहळू खासगी रुग्णालयांवरही येणार आहे. खासगी रुग्णालयंही तुडुंब भरली आहे.

coronavirus-test-1606815937

ज्याला कोरोना झालेला नाही, आणि तरीही एखादा रुग्ण क्रिटीकल झाला, तर त्यालाही आता कोणत्या रुग्णालयात जाऊन उपचार मिळू शकतील, याची कल्पनाही करवत नाही. कारण एखाद्याकडे पैसे असतील, पण बेड उपलब्ध करण्याचं मोठं आताच लोकांना सतावू लागलंय. १५ लाखाची लोकसंख्या असलेल्या राज्यात पहिल्या लॉकडाऊननंतर सरकारनं, प्रशासनानं आणि लोकांनी किती बोध घेतला हाही प्रश्न आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय की वेळेत उपचार घेण्यासाठी पुढे. पण उपचार देण्यासाठी कोणतं रुग्णालयत रिकामं आहे?, कुठे उपचार मिळू शकतील? तातडीनं कोणती यंत्रणा मदतीला धावून येईल? याचा बद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. त्याचं निराकरण करणं याला प्राधान्य देण्याची गरज आहे. यात एक गोष्टी सगळेच विसरुन जात आहेत. राज्यात बेड्सची सुविधा वाढवता येईल. एका मोठ्या सभागृहाचं, हॉलचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करता येईल. पण एका रात्रीत डॉक्टर तर तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांची कमी कशी भरुन काढली जाणार, हाही प्रश्न कायम आहे.

दरम्यान, आता तर जीएमसी प्रशासनानं सुट्टीच्या दिवशीही आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना काम करायला बोलावलं आहे. ही वेळच अशी आहे की आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागणार आहे. पण कर्तव्य फक्त डॉक्टर्स, नर्स, पोलिस, सरकार, प्रशासन यांचंच नाही. कर्तव्य सर्वसामान्य लोकांचंही आहे. त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. मास्क घातलाच पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग राखलंच पाहिजे. तर आणि तरच कोरोनाला रोखता येईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!