गोवा माईल्सचा निर्णय घेताना पर्रीकरांनी विश्वासात घेतलं नाही- मायकल लोबो

गोवा माईल्सवरुन मायकल लोबोंचं विधान

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांचं कामकाज तहकूब झाल्यानंतर मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना गोवन वार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी गोवा माईल्स आणि टॅक्सी चालकांच्या वादावर प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मायकल लोबो यांनी धक्कादायक विधान केलंय.

पर्रीकरांवर निशाणा

मंत्री मायकल लोबो यांनी पर्रीकरांवर निशाणा साधलाय. पर्रीकरांनी मुख्यमंत्री असताना कुणालाही विश्वासात न घेता गोवा माईल्सबाबतचा निर्णय घेतल्याचं मायकल लोबो यांनी म्हटलंय. पर्रीकरांच्या या निर्णयामुळे आता स्थानिक टॅक्सीचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं लोबो यांनी नमून केलंय. पर्रीकरांना गोवा माईल्स टॅक्सी ऍप बाबत चुकीची कल्पना देण्यात आली असावी, असा संशही त्यांनी व्यक्त केलाय. मात्र आताचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या संपूर्ण वादाबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊन तोडगा काढतील, असं म्हणत त्यांनी टॅक्सी चालकांना आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केलाय.

6 ऑगस्ट 2018ला गोवा माईल्सचं लॉन्चिंग

काय म्हणाले लोबो?

टॅक्सीचालकांच्या प्रश्नावर माझं व्यक्तिगत लक्ष आहे. पर्रीकरांना गोवा माईल्सची चुकीची कल्पना देण्यात आली. गोवा माईल्स गोव्यामध्ये नाही चालू शकत. गोवा माईल्समुळे स्थानिकांना त्रास होतो आहे. जर गोवा माईल्स ऍप बेज्झ टॅक्सीसेवा आहे, तर दाबोळी विमानतळवर त्यांचा काऊंटर का आहे? पर्रीकरांनी गोवा माईल्सच्या घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक टॅक्सी चालक अडचणीत आले आहेत. त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. त्याचा फटका आता सहन करावा लागतोय. या संपूर्ण वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. लवकरच हा वाद कायमचा मिटवण्यासाठी तोडगा काढण्यात येईल. मात्र गोवा माईल्सवर तातडीनं बंदी आणण्याच निर्णय तडकाफडकी घेतला जाऊ शकत नाही. त्यावर अभ्यास करुन आणि चर्चा करुन योग्य तो तोडगा काढला जाईल.

पाहा व्हिडीओ –

टॅक्सी चालकांचा इशारा

गेल्याच आठवड्यात टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती. या प्रकरणी सुवर्णमध्य काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी चालकांना दिलं होतं. असं असलं तरी गोवा माईल्सवर बंदी आणण्याची मागणी टॅक्सी चालक-मालक संघटनांनी लावून धरली होती. यावरुन सरकारला अल्टीमेटमही देण्यात आला होता. अशातच आता पर्रीकरांचं नाव घेत मायकल लोबोंनी गोवा माईल्सबाबत केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलंय.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर काय म्हणाले होते टॅक्सी चालक पाहा..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!