गंभीर आरोप! ‘मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये मटक्याचा धंदा…’

कांदोळकरांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून भाजपा सरकाराविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता कांदोळकर आणि सरकारमधील संघर्ष पेटलाय.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : सरकार आणि काही राजकारणी माझ्या विरुद्ध कटकारस्थान करत आहेत. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या (Pramod Sawant) कॅबिनेटमध्येच मटक्याचा धंदा सुरु असल्याचा खळबळजनक आरोप किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी केलाय. यावर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केल्यानं कांदोळकरांच्या वक्तव्याला महत्त्व आलंय.

राजकीय भूकंपाचे पडसाद
10 काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाने काही महिन्यांपूर्वी गोव्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. त्या भूकंपाचे राजकीय धक्के अजूनही जाणवत आहेत. दहा काँग्रेस आमदारांच्या भाजपा प्रवेशात थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकरांचाही (Nilkanth Halarnkar) समावेश आहे. हळर्णकरांच्या भाजपा प्रवेशाने थिवीचे भाजपाचे माजी आमदार किरण कांदोळकर तीव्र नाराजी उघडपणे दिसून आली आहे. कांदोळकरांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून भाजपा सरकाराविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता कांदोळकर आणि सरकारमधील संघर्ष पेटलाय.

सूडबुद्धीतून कारवाई?
30 सप्टेंबर रोजी म्हापश्यातील एका फ्लॅटवर धाड घालण्यात आली होती. यामध्ये क्रायम ब्रांचने 3 जणांना अटक केली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे 50 हजारांच्या रोकडसह मटकासंबंधी इतर साहित्यही जप्त केलं होतं. तेव्हा हा फ्लॅट एका राजकारण्याचा असल्याची चर्चा सुरु झाली होती. अप्रत्यक्ष त्याचा सबंध थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकरांशी जोडला गेला. किरण कांदोळकारांनी सरकारविरुद्ध दाखविलेली आक्रमता आणि त्याचवेळी घडलेले हे धाडसत्र, याचा संबंध लावत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या सर्व प्रकरणाबद्दल बोलताना किरण कांदोळकरांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध खळबळजनक आरोप करत निशाणा साधलाय.

माजी आमदार किरण कांदोळकर म्हणतात…
जी धाड पडली त्याची माहिती मला पेपर आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून मिळाली. ज्या फ्लॅटवर ही धाड पडली तो फ्लॅट माझा नाही. यात माझा कसलाही सहभाग नाही. सरकाराच्या विरोधात मी आवाज उठवल्यानं माझ्या बदनामीचे कारस्थान रचलं जातंय.. या कारस्थानामागे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंचा (Sadanand Shet Tanavade) सहभाग आहे.

तो फ्लॅट एका भाजपा कार्यकर्त्याचाच?
हा फ्लॅट माझा म्हणून जे काही चित्र रंगविण्यात आले आहे ते चुकीचे आहे, असा दावा कांदोळकरांनी केला आहे. तो फ्लॅट भाजपाच्याच एका कार्यकर्त्याचाच असल्याचाही आरोप कांदोळकरांनी केलाय. पोलिसांनी सखोल चौकशी करावी. धाड घालणे हे पोलिसांचे कामच आहे. त्यावर मी काही भाष्य करु इच्छीत नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावं, अशी मागणी किरण कांदोळकरांनी केली आहे.

हो, मी मटक्याच्या धंद्यात होतो, पण….
हो, मी पूर्वी मटक्याच्या धंद्यात होतो, ही बाबही कांदोळकरांनी स्वीकारली. मात्र तो भूतकाळ झाला, असंही ते म्हणालेत. लोकांनाही त्याची कल्पना आहे. मात्र आताच्या घडीला मी मटक्याच्या धंद्यात नाही, असा प्रामाणिक दावाही किरण कांदोळकरांनी केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!