सोपटेंना ग्रीन सिग्नल पण बाबु आजगांवकराचं काय?

पेडणे भाजपात मोठा उठाव शक्य

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पेडणेः भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांना उमेदवारी मिळण्यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत. सोपटेंना उमेदवारीची हमी मिळाल्यानंतर शेजारच्या पेडणे मतदारसंघातील भाजप गोटात चलबिचल सुरू झाली आहे. पेडणेत भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री बाबु आजगांवकर यांच्या उमेदवारीला तीव्र आक्षेप घेतल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त होते. पेडणेतून स्थानिकालाच उमेदवारी देण्यात यावी अन्यथा पक्षाच्या विरोधात काम करावे लागेल,असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्याची खबर आहे.

सोपटेंचा त्याग पण बाबुंचा स्वार्थ

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. अंतर्गत विरोधाचा सामना करूनही त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडून येऊन आपली लोकप्रियता सिद्ध केली. एवढे करूनही सरकारात सोपटेंना मंत्रीपद देण्यात आले नाही. बाबु आजगांवकर यांना मात्र थेट पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. आपण नेहमीच सत्तेबरोबरच राहु असं जाहीर विधान करणारे बाबु आजगांवकर भविष्यात पक्षाबरोबर राहणार याची हमी कोण देतो,असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी दिला. मगो पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर आपण आपल्या बळावर निवडून आल्याचा दावा ते करतात.

भविष्यात भाजपचा त्याग करून आपण स्वबळावरच निवडून आलो,असे म्हणायला ते मागे राहणार नाहीत. त्यांना आपल्या लोकप्रियतेचा एवढाच घमेंड असेल तर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडून यावे,असेही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकांच्या विकासासाठी पक्षांतर करणाचे कारण पुढे करून आपला स्वार्थ साधण्याच्या या राजकारणाला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. पेडणेत आता सक्षम स्थानिक उमेदवार तयार आहेत. त्यापैकीच एकाला उमेदवारी देऊन भाजपने पेडणेकरांना न्याय द्यावा,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

फक्त डॉ. सावंत यांच्या स्थिरतेसाठी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला स्थिरता प्राप्त व्हावी या हेतूनेच बाबु आजगांवकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मौन धारण केल्याचे पेडणेतील भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 2017 च्या निवडणूकीत बाबु आजगांवकर यांनी प्रचारात माजी मुख्यमंत्री आणि माजी सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत वारपरलेले अपशब्द अजूनही पेडणेतील भाजप कार्यकर्त्यांच्या कानात गुंजत आहेत. पेडणेचे चार वेळा प्रतिनिधीत्व करूनही याठिकाणी पाणी, वीज, रस्त्यांसाठी लोकांना रस्त्यावर यावे लागते. पेडणेत होऊ घातलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे पेडणेकरांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला आहे. अशावेळी केवळ स्थानिक उमेदवारच या आव्हानांचा सामना करू शकतो. आयात केलेला लोकप्रतिनिधी केवळ आपला स्वार्थ साधून गायब होणार आहे. भाजपने बाबु आजगांवकर यांना उमेदवारी मिळणार नाही, याची स्पष्ट कल्पना देऊन स्थानिक उमेदवाराची निवड करावी जेणेकरून प्रचार कार्याला सुरूवात करता येईल. आपल्या लोकप्रियतेचा एवढा घमेंड असलेल्या बाबु आजगांवकरांना स्वबळावर निवडून येऊन आपली लोकप्रियता सिद्ध करण्याची संधी भाजपने द्यावी. एरवी भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे आणि सत्ता तिथे बाबु आजगांवकर असल्यामुळे ते निवडून आले तर पुन्हा सरकारात येतील,असा टोलाही यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हाणला.

सामूहिक उठावाची चाहूल

पेडणेतील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्थानिक उमेदवाराची कल्पना दिली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पक्षाने निर्णय घेतला नाही तर बाबु आजगांवकर यांच्या विरोधात सामुहीक बंड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पेडणे मतदारसंघातील बाबुआजगांवकर समर्थक सर्व सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य आदी या उठावात भाग घेतील,अशीही माहिती मिळाली आहे.

उठाव शमविण्यासाठी बाबुंचे प्रयत्न

स्थानिक उमेदवाराच्या समर्थनार्थ आपल्या विरोधात पेडणेतील भाजप कार्यकर्त्यांच्या संभावित उठावाची कल्पना उपमुख्यमंत्री बाबु आजगांवकर यांना आली आहे. या अनुषंगाने त्यांनी या सर्व पंच, सरपंचांचा पाठींबा मिळवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. भाजपचे काही कार्यकर्ते बाबु आजगांवकर यांच्या या प्रयत्नांना बळी पडत असल्याने भाजपमधील हा असंतुष्ट गट अस्वस्थ बनला आहे. बाबु आजगांवकर हे आपली मोहीनी सगळ्या कार्यकर्त्यांवर टाकण्यापूर्वीच हा उठाव व्हावा यासाठी आता ते प्रयत्नात आहेत,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!