गोव्याचे निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांचा अखेर राजीनामा

सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढल्यानंतर चोखाराम गर्गांनी अखेर राजीनामा दिला.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढल्यानंतर शेवटी गोवा राज्य निवडणूक आयुक्त आयएएस चोखाराम गर्गांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. चोखाराम गर्ग यांच्या कारभारावर कोर्टाने तर टीका केली होतीच मात्र राज्यातील विरोधी पक्ष तसंच सामाजीक संस्था आणि कार्यकर्त्यांनीही चोखाराम गर्ग यांच्यावर सडकून टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

राज्यातील पालिका आरक्षणाचा वाद आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात पोचला होता. हायकोर्टाने राज्यातील मडगांव, मुरगांव, म्हापसा, केपे आणि सांगे या पाच पालिकांच आरक्षण नव्याने जाहीर करुन परत निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. हायकोर्टाच्या या आदेशाला गोवा सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिल होतं. सुप्रीम कोर्टानेही शेवटी हायकोर्टाचाच निवाडा उचलून धरत सरकार तसंच निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रखर टीका केली होती.

सुप्रीम कोर्टाने असे ओढले होते ताशेरे

निवडणूक आयुक्त जे कायदा सचिव आहेत त्या चोखाराम गर्गांनी 5 फेब्रुवारी 2021 रोजी डीएमए संचालकांना लवकरात लवकर आरक्षण घोषित करण्यासाठी पत्र लिहिले. मात्र डीएमए संचालकांनी 4 फेब्रुवारी म्हणजे निवडणूक आयुक्तांनी पत्र लिहिण्याच्या एक दिवस आधीच परिपत्रक काढून आरक्षण जाहीर केलं.

निवडणूक आयुक्त जे कायदा खात्याचे सचिवही आहेत त्यांनी हाय कोर्टाच स्पष्ट उल्लंघन केलं आहे. सरकारी कार्यालये 9.30ला सुरु होत असताना निवडणूक आयुक्तांनी सकाळी 9 वाजता निवडणूक वेळापत्रक जाहीर केलं. त्याच दिवशी हायकोर्टात पालिका आरक्षणला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 9.30ला सुनावणी सुरु होणार होती.

या सर्व प्रकारात सगळ्यात खेदजनक बाब ही आहे की जो व्यक्ती कायदा सचिव पदावर आहे त्याच्याचकडे निवडणूक आयुक्तपदी देण्यात आलय. संविधानाप्रमाणे निवडणूक आयुक्तपदावर पूर्णवेळ अधिकारी असणं बंधनकारक आहे. कारण लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला खूप महत्व आहे. सरकारनं तात्काळ या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमावा. तसंच अन्य राज्यांनीही याची दखल घेवून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं सुप्रीम कोर्टान सांगितल होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!