‘भाजप सोडा, विश्वजीत राणे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो’

गोवा फॉरवर्डची विश्वजीत राणेंना ऑफर

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : मेळावलीवासींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत राणेंनीही अखेर आयआयटी नकोचा सूर आळवला. त्यानंतर स्वाभाविकपणे त्यांना आता राजकीय ऑफर्स येऊ लागल्या आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाकडून त्यांना थेट पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. विश्वजीत राणेंनी गोवा फॉरवर्डमध्ये यावं आम्ही त्यांना मुख्यमंत्री करु, अशाप्रकारचं वक्तव्य गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी केलं आहे.

आयआयटीवरुन राजकीय धुळवड

विश्वजीत राणेंना आम्ही मुख्यमंत्री करु, आता त्यांनी भाजप सोडायला हवी, असं वक्तव्य गोवा फॉरवर्ड पक्षाकडून करण्यात आलंय. सरकारनं पुढच्या चार दिवसांत शेळ मेळावलीचा मुद्दा निकालात काढला नाही तर राज्य सरकारमधील आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला देण्यात आलाय. त्यांनी भाजप सोडून गोवा फॉरवर्ड पक्षात यावं, आम्ही त्यांनी मुख्यमंत्री करु असंही वक्तव्य करण्यात आलंय. भविष्यात विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री होण्याची नामी संधी असल्याचंही वक्तव्य करण्यात आलं आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते किरण कांदोळकर आणि दुर्गादास कामत यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

शेळ मेळावलीतील लोकांना पाठिंबा देण्यासाठी म्हापशात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय. विश्वजीत राणेंनी सत्तरीत आयआयटी नकोच, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील एकूणच राजकीय वातावरण ढवळून निघालंय. अशातच गोवा फॉरवर्डनंही विश्वजीत राणेंनी ऑफर दिल्यानं, येत्या काही दिवसांत या संपूर्ण घटनेने वेगवेगळे राजकीय पडसाद उमटतील यात शंकाच नाही.

काय म्हणालेत विश्वजीत राणे?

शेळ-मेळावलीतील आयआयटीविरोधाला आता विश्वजीत राणेंनीही पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री असणाऱ्या विश्वजीत राणेंच्या मतदारसंघातील शेळ-मेळावलीत प्रस्तावित आयआयटीला गेल्या काही दिवसांपासून विरोध वाढतोय. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी दुपारी फेसबुक लाईव्ह करत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी आयआयटी सत्तरीत नकोच, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

आयआयटीचा विकास प्रकल्प चांगला जरी असला तरी माझ्या मतदारसंघातील लोकांचा जर या प्रकल्पाला विरोध आहे, तर मला त्यांच्या बाजूनं उभं राहावंच लागेल, असं विश्वजीत राणेंनी म्हटलं आहे. हा विरोध पाहता सत्तरीत आयआयटी नको, असं वक्तव्य फेसबुक लाईव्हद्वारे आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच गावकऱ्यांना नोंदवण्यात आलेल्या तक्रारीही मागे घेतल्या जाव्यात अशीही मागणी विश्वजीत राणे यांनी केली आहे. दुसरीकडे त्यांनी महिलांवर हात उगारणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली. महत्त्वाचं म्हणजे आयआयटीचा प्रकल्प सत्तरी करु नये, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!