Fact Check | गोविंद गावडे शेळ-मेळावलीप्रकरणी धडधडीत खोटं बोलले?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : 6 आणि 7 जानेवारीला शेळ-मेळावलीवासीयांनी केलेलं आंदोलन राज्यभर गाजलं. या आंदोलनानं उग्र रुपही धारण केलं होतं. मात्र याच दरम्यान, शेळ-मेळावलीप्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी एक विधान केलं होतं. हे विधान खोटं असल्याचा दावा केला जातोय. खरंतर शेळ-मेळावलीतील प्रस्तावित आयआयटी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी आयआयटी सत्तरीत नकोच, अशी भूमिका घेतल्यानंतर भाजप बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता या सगळ्यात गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले होते गोविंद गावडे?
११ जानेवारीला पत्रकारांनी गोविंद गावडे यांना आयआयटीविरोधावरुन प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी आयआयटी होणारच, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. इतकंच नाही, तर ज्या जमिनीत आयआयटीचा प्रस्तावित प्रकल्प होता त्या जमिनी एसटी समाजाच्या आहे, याची माहिती मला नाही, असं विधान त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती. आयआयटीबाबतचा अखेरचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले होते. जर त्या जमिनी एसटी समाजाच्या असतील, तर त्यांनी रितसर तक्रार करावी, असंही गोविंद गावडे यांनी म्हटलं होतं. आदिवासी आयोग त्यांना न्याय मिळवून देईल, असंही ते म्हणाले होते.
अजूनही मला कोणतेही आदिवासी समाजातील लोक येऊन भेटलेले नाही, ज्यांनी मला आमच्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली आहे, असं त्यांनी नमूद केलं होतं. बाहेरचं कुणीतरी बोलतं म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असंही गोविंद गावडे यांनी म्हटलंय.
नेमकं गोविंद गावडे काय म्हणाले होते, त्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा.
गोविंद गावडे खोटं बोलले?
दुसरीकडे आता शेळ-मेळावलीतील लोकांनी कागदोपत्री दाखल केलेल्या तक्रारींचे फोटो फेसबुकवर वायरल झाले आहेत. या फोटोमध्ये गोविंद गावडे यांच्या वक्तव्यावरुन टीका केली जाते आहे. शेळ-मेळावलीतील लोकांनी जुलै २०२०मध्येच गोविंद गावडेंनाही लेखी पत्र दिल्याची नोंद समोर आली आहे. गोविंद गावडेंसोबत मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची कॉपी देण्यात आली होती, असा दावा फोटोमधून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या पत्रामध्ये २२ जुले २०२० ही तारीखही स्पष्टपणे दिसते आहे. अशावेळी गोविंद गावडे यांनी केलेल्या ११ जानेवारीला केलेल्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. गोविंद गावडे खोटं बोललं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

काय खरं? काय खोटं?
शेळ-मेळावलीतील आंदोलनाला यश आलं असलं तरी हे आंदोलन सुरु असताना ज्या पद्धतीनं राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसोबत येत्या विधानसभा अधिवेशनात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचंय.
हेही वाचा –
Fact Check | WhatsAppवर फिरणाऱ्या संप्रेषणाचा तो मेसेज खराय?
कपाळावर टिळा असणाऱ्या व्यक्तीनं बुरखा घातलेल्या महिलेला मारलेली मिठी
थांबा, ‘त्या’ युवतीचे फोटो व्हायरल करत असाल, तर हे वाचा…
एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर