कोविड योद्धे म्हणतात शबय, शबय! पगारवाढीच्या घोषणेची वर्षपूर्ती

वित्त खात्याकडे वर्षभर प्रस्ताव पडून

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः हल्ली राजकारणात एक गोष्ट हमखास दिसून येते. लोकांना मुर्ख बनवणं हे आपल्या डाव्या हाताचं काम अशीच काहीशी धारणा राजकीय नेत्यांची बनलीए. मग आकाशातून चंद्र, तारे सुद्धा आणून देतो म्हणाले तरीही या देशातली बिचारी गरजवंत आणि असहाय्य जनता खरी मानते. मग हेतू साध्य झाला की हा तर जुमला होता,असं सांगून नामानिराळं व्हायचं हे सुद्धा हे राजकारणी सहजपणाने करतात. आता आपल्याकडेच बघा की गेल्या 6 एप्रिल 2020 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठ्या दिमाखात कोरोना यौध्यांना 20 टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सोमवार 6 एप्रिल 2021 रोजी वर्षपूर्ती होईल. पगारवाढ तर नाहीच पण कोरोना यौध्यांनी कोरोना महामारीच्या पहिल्या भीषण लाटेतून सर्वसामान्य लोकांना वाचवण्यासाठी केलेल्या सेवेचीही आठवणही कुणी काढताना दिसत नाही.

… म्हणे प्रस्ताव वित्त खात्याकडे

अलिकडेच झालेल्या विधानसभा अधिवेशनात कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी यासंबंधीचा प्रश्न आरोग्य खात्याला विचारला होता. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात कोरोना यौद्धे म्हणून सेवा बजावलेल्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना 20 टक्के पगारवाढ जाहीर केल्याचे त्यांनी मान्य केले. यासंबंधीचा प्रस्ताव वित्त खात्याकडे पाठवल्याची माहिती त्यांनी यातून दिली. एवढेच नव्हे तर आरोग्य खात्यात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावणारे किती कर्मचारी स्वतः कोरोनाबाधीत झाले याची आकडेवारीही या माहितीतून उघड झाली आहे.

घोषणा मुख्यमंत्र्यांची, जबाब आरोग्यमंत्र्यांचा

कोरोना यौद्धांना पगारवाढ देण्यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. परंतु वर्ष उलटले तरी ही पगारवाढ मिळाली नाही, याबाबतचा जबाब मात्र आरोग्यमंत्र्यांना द्यावा लागतोय. आरोग्य खाते तथा जीएमसीने यासंबंधीची यादी तयार केली होती. ही यादी आरोग्य खात्याला पाठविण्यात आल्याचीची खबर आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रूपयांच्या विमा कवचाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. यासंबंधी विमा कवचाबाबत कुणीही काहीही विचारले नाही किंवा कुठल्याही अर्ज किंवा फॉर्मवर सही घेतली नाही,असे कोरोना योध्यांचे म्हणणे आहे.

कंत्राटी आणि चतृर्थश्रेणी कामगार आशेवर

कोरोना काळात सेवा बजावणारे सफाई कामगार, तसेच कंत्राटी पद्दतीवरील कर्मचाऱ्यांनाही ही पगारवाढ दिली जाईल,असे मुख्यमंत्री म्हणाले होते. या काळात सेवा बजावणारे कित्येक कंत्राटी कामगार बिचारे किती पगारवाढ मिळणार याचे हिशेब करून थकले तरीही एकही पैसा पगारवाढीचा मात्र मिळाला नाही. कोरोना यौद्धांचा प्रस्ताव वित्त खात्याकडे वर्षभर पडून आहे आणि बाकी राज्यात उत्सव, सण, सोहळ्यांचे प्रस्ताव मात्र झटपट मोकळे होतात यावरून कोरोना योध्यांची काय कदर प्रशासनात आहे, हेच कळून चुकते,अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय.

केवळ पुष्पवृष्टीने कोरोना योद्ध्यांचे समाधान

कोरोना यौद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सेवेची कदर केली जात असल्याचे भासवण्यासाठी देशभरात कोरोना यौद्धांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. विमानांतून पुष्पवृष्टी करण्याच्या या कार्यक्रमाचा मोठा इवेंट करण्यात आला. पण कोरोना योद्धांच्या पगारवाढीची वृष्टी मात्र झालीच नाही.

देशात पहिल्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक कौतुक जर कुणाचं झालं असेल तर ते वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाचं. डॉक्टर, नर्सेस ते अगदी इस्पितळातील सफाई कर्मचाऱ्यांपासून सगळ्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोनापासून लोकांची सेवा करण्यासाठी आपल्या प्राणांजी बाजी लावली. इतकेच नव्हे तर त्यात सफाई कामगार, रूग्णवाहिकांचे चालक, अग्निशमन दलाचे जवान, पोलिस कर्मचारी आदींच्या कामाचेही कौतुक करावेच लागेल. या काळात या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेची सध्याच्या परिस्थितीत नुसती आठवण जरी काढली तरीही त्यांच्या अंगावर काटा येईल, अशा संकट, आव्हानांना त्यांना सामारे जावं लागलं. पण त्यांच्या या सेवेची कदर खरोखरच केली जात आहे का ? हा प्रश्न आता दुसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर करावा लागणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!